डॉक्टर रेड्डी साहेब धाक संपलाय… ‘उपचार करा हो’…!

---Advertisement---

 

जळगाव शहरातील शनिपेठ ज पोलीस स्टेशनच्या आवारात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जातात, माजी नगरसेवक कैलास सोनवणेंना मारहाण होते… विशेष म्हणजे या हाणामारीत एका महिलेचाही समावेश होता. आणि धक्कादायक म्हणजे हा सारा प्रकार पोलिसांच्या साक्षीने होतो. आहे की नाही धक्कादायक प्रकार? ‘सदरक्षणाय.. खलनिग्रहनाय ‘हे वाक्य केवळ भिंतीवर शोभेपुरतं उरलयं का? असा प्रश्न या घटनेनंतर निर्माण होतो. मग आठवण होते याच पोलीस स्टेशनच्या आवारात घडलेल्या एका घटनेची.

दिवंगत पोलीस अधीक्षक दीपक जोग यांनी अशा प्रकारे पोलीस स्टेशन आवारात धुडगुस घालणाऱ्या दोन तत्कालीन नगरसेवकांना बेदम चोप दिला होता. त्यावेळी ते नगरसेवक देखील सत्ताधारीच होते… हे विशेष.. कायद्याचे रक्षक असलेल्या यंत्रणेच्या नजरेसमोरच कायद्याचा उघड उघड भंग होत असेल तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा तरी कोणाकडून करावी? ही केवळ एक घटना नाही तर जिल्ह्यातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेच जिवंत उदाहरण आहे. पोलीस अधीक्षकांच्या धाकाचा उल्लेख केवळ कागदोपत्री रहायलाय काय ? गुन्हेगारांना कायद्याची भीती उरलेली नाही, हे पुन्हा दिसून येत आहे. राजकीय पाठबळ, स्थानिक दबाव आणि प्रशासनाची निष्क्रियता या त्रिसूत्रीमुळे गुन्हेगारीच जाळ दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालल आहे.

दुसरा एक प्रकार म्हणजे जळगाव शहरातील दक्षता पेट्रोलपंपावर रक्षकच भक्ष्यक झाला… कोट्यवधीचा पैसा पंपाच्या खात्यात जमा होत नसताना त्याकडे दुर्लक्ष झाले… हा निष्काळजीपणा नाही काय? आमची गिरणामाय ओरबाडली जातेयं.. अनधिकृत वाहने भरधाव धावतात… निरपराध माणसांचे बळी जातात … येथे केवळ पर्यावरणाचा नाश होत नाही तर बऱ्याच जणांचे बळी जातात. अपघात करणारे वाहन गायब होते… जबाबदार चालकही गायब होतो. दोर्षीवर कारवाई कागदावरच रहाते. प्रश्न असा आहे की हे सर्व पोलीस प्रशासनाच्या नजरेआड कस काय राहत ? की जाणुनबुजून दुर्लक्ष केल जात ? चोरी, मारामाऱ्या, सायबर गुन्हे प्रत्येक क्षेत्रात गुन्हेगारी वाढताना दिसते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र प्रशासन केवळ आकडेवारी सादर करण्यात व्यस्त आहे. गुन्हा घडूच नये, यासाठी ठोस पावल उचलण गरजेचे आहे. गुन्ह्याचा तपास लागला की स्वतः रेड्डी साहेब पुढाकार घेऊन पत्रकार परिषद घेऊन माहिती देतात पण जे घडल त्यावर बोलायला टाळले जाते किंवा उत्तरच मिळत नाही? हे कितपत योग्य आहे. आज गरज आहे ती ‘प्रतिक्रिया’नव्हे तर ‘प्रतिबंध’ करण्याची. पोलीस प्रशासनाने आपली जबाबदारी ओळखून कठोर पावल उचलली पाहीजेत. राजकीय दबावाला झुगारून निष्पक्ष कारवाई झाली तरच कायद्याचा धाक पुन्हा निर्माण होईल. अन्यथा, पोलीस ठाण्याच्या आवारात होणाऱ्या हाणामाऱ्या हीच नवी ‘नियमितता’ ठरेल.

या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या सर्व घटनांची अत्यंत गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्यात बिघडत चाललेली कायदा सुव्यवस्था ही केवळ स्थानिक प्रश्न राहिलेला नाही, तर ती राज्याच्या प्रशासनिक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.तातडीने कठोर निर्देश देऊन, जबाबदाऱ्या निश्चित करून आणि निष्क्रियतेवर कारवाई करूनच परिस्थितीवर नियंत्रण मिळविता येईल, सामान्य नागरिकांच्या मनातला प्रश्न आज अधिक तीव्र झाला आहे तो म्हणजे पोलीस प्रशासन करतयं तरी काय? पोलीस ठाण्यात घुसून हाणामाऱ्या असे प्रकार दुर्दैवाने अधूनमधून घडत असतात. मात्र या घटना कायदा व सुव्यवस्थेवरील प्रश्न अधिक तीव्र करतात. या सर्व घटनांमध्ये एक समान धागा दिसतो पोलीस ठाणे जे सुरक्षिततेचे प्रतीक असायला हवे तेच संघर्षाचे केंद्र बनत आहे. यामागे दोन गोष्टी स्पष्टपणे जाणवतात त्या म्हणजे पोलिसांबद्दलचा कमी झालेला धाक तक्रारदार किंवा कार्यकर्त्यांमधील वाढती आक्रमकता यामुळेच शनिपेठ सारख्या घटना घडतात व घडतील. अरे पोलीस स्टेशनच सुरक्षित राहिले नाही तर रस्त्यावरच्या सामान्य नागरिकांची स्थिती काय असेल हा प्रश्न अधिक गंभीर आहे. डॉ. महेश्वर रेड्डी एक तरूण अधिकारी आहेत… त्यांनी ते येथे रूजू झालेला काळ आठवावा… तो चांगलाच होता. मग आता काय झाले? अधिकारी प्रारंभीच्या काळात कडक धोरण अवलंबतात नंतर ‘चलने दो रे.’… असे होऊ नये. भविष्यात भरपूर कारकिर्द पहायची आहे… त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये झालेली घटना दुर्लक्षुन चालणार नाही. कोणताही राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना असे शिकवत नाही की त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये हाणामारी करावी, गुंडगिरी करावी, ती त्यांची प्रवृत्ती असते… आणि अशाच प्रवृती शोधुन कडक प्रशासकाची भूमिका निभावली तर जनताही तुम्हाला सॅल्युट मारेल… आदराने नाव घेईल हे नक्कीच नक्की…!

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---