---Advertisement---
अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराणने कतारमधील अल उदीद येथील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला केला होता. या हल्ल्याची पूर्वकल्पना इराणने दिली होती अशी माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दिली. नेदरलँड्समधील हेग शहरात सुरू असलेल्या नाटो शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ट्रम्प आले होते. शिखर परिषदेनंतर आयोजित पत्रपरिषदेत बोलताना ते म्हणाले, अमेरिकेने इराणचे आण्विक तळ नष्ट केल्यानंतर इराणकडून आलेली प्रतिक्रिया खूपच सौम्य होती.
तेहरानने १४ क्षेपणास्त्रे डागली. त्यापैकी १३ क्षेपणास्त्रे आमच्या जवानांनी आकाशातच भेदली. कतारमधील आमच्या तळावर हल्ला करण्याची पूर्वकल्पना दिल्याने आमच्या लष्कराने पूर्ण तयारी केली होती. यामुळे जीवितहानी टळली, तसेच कोणी जखमी झाले नाही. इराणमधील तीन आण्विक तळ आम्ही पूर्णपणे नष्ट केले आहेत.
आता इराण अण्वस्त्रे बनवू शकणार नाही. भविष्यात त्यांनी असा प्रयत्न केल्यास त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बागाई यांनीदेखील आण्विक तळे उद्ध्वस्त झाल्याची कबुली दिली आहे, असे ट्रम्प म्हणाले.
इराण-इसायल चर्चा पुढील आठवड्यात
ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेच्या मध्यस्थीने पुढील आठवड्यात इराण-इसायल या दोन्ही देशात चर्चा होणार आहे. मी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांना इराणसोबत संभाव्य कराराचा मसुदा तयार करण्यास सांगितले आहे. तथापि, प्रस्तावित चर्चा अणु मुद्यावर असेल की व्यापक शांतता करारावर असेल हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
इसायलने अमेरिकेच्या दबावाचे आरोप फेटाळले
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलने इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेवर दबाव आणल्याच्या वृत्तांना फेटाळून लावले आहे. नेतान्याहू म्हणाले की हा दावा पूर्णपणे निराधार आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या देशाच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे, ज्याचे आम्ही समर्थन करतो.