इस्रायलचा हमासच्या दहशतवाद्यांवर बॉम्ब वर्षाव; इराणने दिली धमकी

नवी दिल्ली : ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरु झालेला इस्रायल-हमास संघर्ष आणखीनच चिघळला आहे. इस्रायलने हमासवर गेल्या २४ तासांत गाझा पट्टीत बॉम्बवर्षाव केला. इस्रायलच्या या हल्ल्यात ४० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. तर २२४ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. इस्रायल सातत्याने गाझा पट्टीत हमासच्या दहशतवाद्यांची कत्तल करण्याचाठी त्यांच्या ठिकाणांवर हल्ला करत आहे.

गाझा पट्टीत सुरु असलेल्या युद्धाची व्यापकता आता दिवसेंदिवस वाढत आहे. हमाससोबतच आता लेबनॉनमधील इराण-समर्थित हिजबुल्लाविरुद्ध सुद्धा संघर्ष सुरु झाला आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅटझ यांनी इराण आणि हिजबुल्लाला धमकी दिली आहे. ते म्हणाले की, इराण विनाशकारी युद्धाबद्दल बोलत आहे, परंतु हा संदेश त्याला विनाशाकडे घेऊन जाईल. “विनाशाची धमकी देणाऱ्या सरकारांचा नाश झाला पाहिजे,” असे कॅटझ यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

इस्रायल – हिजबुल्ला संघर्ष उफाळून आल्यास, याचे घातक परिणाम होतील, अशी भिती तज्ञांनी व्यक्त केली आहे. लेबनॉनवर लष्करी आक्रमण केले तर ते विनाशकारी युद्धाला चालना मिळेल. जर परिस्थिती आणखी बिघडली तर आम्ही आमचे सर्व पर्याय वापरू.” अशी धमकी इराणने इस्रायलला दिली आहे.