बेजवाबदार लोकप्रतिनिधीं आणि बिघडलेल्या व्यवस्थेबाबत जनतेत प्रचंड आक्रोश

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : शहरातील विकासाच्या दृष्टीने बिघडलेली व्यवस्था त्यास वठणीवर आणण्यासाठी खुर्च्यांवर बसलेले बेजबाबदार लोकप्रतिनिधी हेच विकासाला अडथळा असल्याचे मत ‘जळगाव फर्स्ट’च्या माध्यमातून १ जानेवारीला येथील आय.एम.ए. हॉलमध्ये झालेल्या चर्चेत मान्यवरांसह नागरिकांनी मांडले.

अधिकारीही काम ऐकत नाही

जळगाव शहर गेल्या काही दशकांपासून मागे येत आहे. येथील नागरिक दुसर्‍या गावांना पलायन करताहेत. शासनातील अधिकारी काम ऐकत नाही. नवीन उद्योगधंदे या ठिकाणी येत नाही. विद्यार्थी जळगावात शिक्षण घेतो पण त्याच्या मानाने नोकर्‍या नसल्याने तो पुणे, मुंबईकडे नोकरी शोधतो. यामुळे जळगाव हे सेवानिवृत्तांचे गाव आहे का? असा प्रश्‍नदेखील उपस्थित करण्यात आला, तर शहरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे खड्डेमय रस्त्यांचा आहे.

मान्यवरांची उपस्थिती

‘जळगावचा खुंटलेला विकास’ या विषयावर सायंकाळी ५ वाजेला ‘जळगाव फर्स्ट’च्या माध्यमातून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रसिद्ध विधिज्ञ ऍड. सुशील अत्रे, दाल परिवारातील प्रमुख प्रेम कोगटा, इंजि. साजिद शेख, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.एस.एस.राणे, उद्योजक किरण बच्छाव, इंजि. तुषार तोतला, बांधकाम व्यावसायिक सपन झुनझुनवाला यांनी आपली मते मांडली. या कार्यक्रमासाठी नगरसेवक, नगरसेविका व नागरिक उपस्थित होते.

अधिकार्‍यांनी सेवानिवृत्तीपर्यंत काळ नेला मारुन

कार्यक्रमाच्या सुरवातीलाच जळगाव महानगरपालिकेत अनेक अधिकार्‍यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंतचा काळ मारून नेत कामे केलीच नसल्याचा आरोप करीत जे नगरसेवक जळगावचा विकास आपली जवाबदारी समजतात तेच याठिकाणी आज आहे, असे मत डॉ.राधेश्याम चौधरी यांनी व्यक्त केले.

रस्त्याविषयीचा प्रचंड रोष

याठिकाणी आलेल्या नागरिकांमध्ये रस्त्याविषयीचा प्रचंड रोष आहे. येथील लोकप्रतिनिधी समाजकारण सोडून स्वार्थ साधत असल्याने जळगावकरांना नरक यातना भोगव्या लागत आहेत. यासाठी सामान्य नागरिकांना बोलावे लागेल, प्रसंगी संघर्षही करण्याची तयारी ठेवावी लागेल, असे मत सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. एस.एस. राणे यांनी मांडले.
‘नगररचना विभाग’ नव्हे तर ‘नगर यातना विभाग’च म्हणा…

भारत विकास परिषदचे इंजि. तुषार तोतला यांनी १९८० ते २०२२ पर्यंतच्या जळगावमध्ये झालेला बदल बघा म्हणत १९८० पूर्वी प्रशासकांमुळे झालेले विकास कामे आजही दखलपात्र आहे. १९८० ते २००० या काळात राजकारण्यांमध्ये कुरघोड्या, पैसा, वैयक्तिक राग, द्वेष, यामुळे जळगाव मागेे पडले. तर मनपाचा नगररचना विभाग नगररचना नसून नगर यातना विभाग झाल्याचे म्हणत ई निविदा विकल्या जातात आणि ठरावीक लोक ते विकत घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

जळगावात उद्योग, नोकर्‍यांअभावी तरुण पुणे-मुंबईकडे

वाहन व्यावसायिक किरण बच्छाव यांनी या शहरात उद्योग येत नाही. शिक्षण आहे पण त्या विद्यार्थ्यार्ंना शिक्षणाच्या अनुरूप नोकर्‍या नाही. खेळासाठी मैदान नाही. मी लक्झर्‍या विकतो तेव्हा कळते की जळगावातून किती लोक पुणे, मुंबईकडे पलायन करतात. कारण त्यांना जळगावात मुलांचे भविष्य दिसत नाही. त्यातूनच या गाड्यांच्या फेर्‍यादेखील पूर्वीपेक्षा वाढल्याचे जाणवते. उद्योगधंदे उभारणे गरजेचे असून स्टार्ट अपच्या माध्यमातून उद्योग उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले. उद्योगपती व दाल परिवाराचे प्रमुख प्रेम कोगटा यांनी जळगावच्या तुलनेत औरंगाबाद झपाट्याने पुढे गेल्याचे सांगत, विमानसेवा सुरळीत सुरू व्हावी, असे कोणालाही वाटत नाही. राजकीय इच्छाच जळगावातील राजकारण्यांची संपली आहे. खराब रस्त्यांमुळे माझ्याकडे येणारा कर्मचारी कामाआधीच अर्धा झालेला असतो. एम.आय.डी.सी तील व्यापार्‍यांना सतत भाडे भरण्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून तगादा लावला.

निविदा प्रक्रिया जास्तीत जास्त ऑनलाईन होणे गरजेचे

महानगरपालिकेतील रस्त्यांचा विषय संपत नाही तोपर्यंत १५व्या मजल्यावर असलेले नगररचना विभाग नकाशे पास करत नसल्याची खंत बांधकाम व्यावसायिक सपन झुनझुनवाला यांनी मांडत, या विभागात जेमतेम अभियंते आहे. तेदेखील व्यवस्थित काम करत नाही. ते काम करणार आहे तर त्या माध्यमातून मनपाच्या करात वाढ होणार आहे आणि त्यातून विकास कामांना निधी देता येईल. २००२ पासून जळगावचा प्लॅन तयार झाला आहे पण अजूून ५० टक्के रस्तेदेखील जळगावात झालेले नाही. परत-परत झालेल्या रस्त्यांवरच काम केले जाते. नागरिक प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र कर भरतात, तरी मनपाची कामे बाहेरील निधीतून होताहेत, मग नागरिकांचा कर जातो कुठे? याचाही शोध लावला गेला पाहिजे, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यात इंजि. साजिद शेख यांनी नागरिक भरत असलेल्या कराच्या माध्यमातून किमान त्याच्या प्रभागातील ५ टक्के काम सुचविणेे, त्याची पाहणी करण्याचा अधिकार नागरिकाला दिला पाहिजे. रेल्वे विभागात आजही प्रामाणिकपणा असल्याने त्यांच्या कामांमध्ये भ्रष्ट्राचाराची दुर्गंधी नाही, असे मत व्यक्त करत सिस्टीम बदलणे व टेंडरिंग जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले जळगावातील प्रसिद्ध विधिज्ञ . सुशील अत्रे यांनी ‘प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखा, यामुळेही विकासाला चालना मिळेल’, असे आवाहन केले. शहरात पायाभूत विकास पूर्ण झाल्याशिवाय पुढचा विकास होणे अशक्य असल्याचे सांगत चांगल्या कामात अडथळा आणू नका आणि असे आणणार्‍याला ठणकावून सांगा, असे म्हणत जात, पैसे आणि पक्षावर लोकप्रतिनिधींची निवड करू नका, असेही सांगितले.

कार्यक्रमात ईश्वर मोरे, शिवराम पाटील, नगरसेविका ऍड. शुचिता हाडा, ऍड. शिरीन अमरीवाला यांनीही आपले मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप तिवारी यांनी, तर आभार ‘जळगाव फर्स्ट’चे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी मानले.