आघाडीत बिघाडी, संजय राऊत यांच्या घोषणेनंतर फुटीवर शिक्कामोर्तब?

मुंबई: लोकसभेनंतर विधानसभेतही विरोधकांनी एकजूट करत महाविकास आघाडी स्थापन करत निवडणूक लढवली होती. मात्र , विरोधकांना विधानसभेत दारुण पराभव स्वीकारावा लागला. हा पराभवांबाबत विरोधक एक दुसऱ्यांना दोषी ठरवत आहेत. यातच महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आघाडीत फूट पडू शकते, असे बोललं जात आहे. आता अखेर याबाबतची महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ठाकरे गट महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या घोषणेनंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याचं मानलं जात आहे. मुंबई, ठाणे, पुणेसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू, निवडणुकीत आमचं काय होईल, हे आम्हाला एकदा आजमावायचं आहे, अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. राऊतांच्या या विधानानंतर आता महाविकास आघाडीतील इतर नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

संजय राऊत म्हणले की, आम्ही मुंबई, पुणे, ठाण्यासह नागपूरपर्यंत महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवू. आता काय होईल ते होईल. आम्हाला एकदा आजमावायचे आहे. नागपुरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आघाड्यांमध्ये काम करताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी देता येत नाही. याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवून आपापले पक्ष मजबूत करणार आहोत.

राऊतांनी स्वबळावर निवडणूक लढण्याच्या केलेल्या घोषणेवर उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाप्रकारे राऊतांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करणे म्हणजे महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातंय.