इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी काँगोमधील एका गावात मोठा हल्ला केला. या हल्ल्यात १६ गावकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिकांच्या मते मृतांचा आकडा अजून वाढू शकतो. डझनभर लोक जखमी झाले आहेत.
किन्शासा : इस्लामिक स्टेट (ISIS) या संघटनेशी संलग्न असलेल्या दहशतवाद्यांनी उत्तर-पूर्व काँगोमध्ये प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये १६ गावकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच दहशतवाद्यांनी आणखी २० जणांचे अपहरण केले आहे. यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरी समाजाच्या गटाने शुक्रवारी ही माहिती दिली. ‘न्यू सिव्हिल सोसायटी ऑफ काँगो’चे समन्वयक जॉन वल्वरिओ यांनी सांगितले की, ‘अलायड डेमोक्रॅटिक फोर्स’च्या हल्लेखोरांनी इटुरी प्रांतातील मंबासा भागात बुधवार आणि शुक्रवारच्या दरम्यान त्यांच्या शेतात काम करत असताना त्यांच्यावर हल्ला केला.
ते म्हणाले, “मृतांची संख्या अद्याप स्पष्ट नाही, कारण अपहरण झालेल्या इतर २० लोकांबद्दल कोणतीही माहिती नाही.” मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असे संकेत त्यांनी दिले. कारण हा हल्ला अत्यंत जीवघेणा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे की, अपहरण करण्यात आलेल्यांमध्ये स्थानिक सरकारी अधिकारी गिल्बर्ट शिवमवेंडा यांची आई आणि बहीण यांचाही समावेश आहे. काँगोमधील अनेक गावे स्थानिक बंडखोरांनी किंवा अतिरेकी विचारधारा असलेल्या दहशतवादी गटांनी सत्ता आणि मौल्यवान खनिज संपत्तीसाठी झुंज दिली आहेत.