---Advertisement---
वॉशिंग्टन : इस्लामिक कट्टरतावाद अमेरिकेसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे. इस्लामच्या नावावर सुरू होणाऱ्या चळवळी केवळ एका भागाचा ताबा मिळवून खिलाफत स्थापन करण्यावर समाधानी नाहीत, तर सतत विस्तार करून संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवण्याचा त्यांचा डाव आहे, अशी टिप्पणी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी केली आहे.
इस्लामिक कट्टरवादी धर्मपरिवर्तन, विस्तारवादाच्या आडून दहशतवाद पसरवत आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रुबियो म्हणाले, कट्टरपंथी इस्लामने वारंवार सिद्ध केले की ते जगाच्या एका कोपऱ्यात मर्यादित राहू इच्छित नाही, तर शक्य तितके प्रदेश ताब्यात घेऊन विस्तार करू इच्छितात. ते संपूर्ण जगासाठी आणि विशेषतः पाश्चात्य संस्कृतीसाठी मोठा धोका आहे.
जगभरातील इस्लामिक कट्टरपंथी चळवळी पश्चिमेला आणि विशेषतः अमेरिकेला पृथ्वीवरील सर्वात मोठे धोका मानतात. हे गट त्यांचा प्रभाव वाढवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, याची अमेरिकेला जाणीव आहे.
बहुतांश दहशतवादी हल्ले कट्टरपंथी इस्लामिक विचारसरणीने प्रेरित आहेत आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी अमेरिका प्रयत्नरत आहे. ख्रिश्चनांविरुद्ध हिंसाचाराचे समर्थन करणारे आणि त्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या देशांना अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नाही. इस्लामिक कट्टरपंथी दहशतवादाचे समर्थक असून, त्यांना संपविण्यासाठी अमेरिका इतर देशांना मदत करण्यास तयार असल्याचे यावेळी रुबियो यांनी सांगितले.
नायजेरिया, इराणचा कट्टरवाद्यांना पाठिंबा
इस्लामिक कट्टरतावाद उघडपणे पश्चिम, अमेरिका आणि युरोपवर वर्चस्व गाजवण्याचे उद्दिष्ट ठेवतो. स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी, वेगवेगळ्या संस्कृती आणि समाजांवर वर्चस्व गाजवण्यासाठी ते कुठल्याही थराला जावू शकतात. नायजेरिया, इराण यांचा कट्टरवाद्यांना पाठिंबा आहे. कट्टरवाद संपुष्टात आणल्याशिवाय दहशतवाद संपणार नाही. यासाठी जगातील प्रमुख देशांनी एकत्र येऊन धोरणात्मक कारवाई करण्यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे रुबियो म्हणाले.
दहशतवादाचे समर्थन करणारे आमचे शत्रू
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की कट्टरपंथी विविध संस्कृती आणि समाजांवर वर्चस्व गाजवण्यासाठी दहशतवाद, हत्या आणि प्राणघातक हल्ले करण्यास तयार आहेत. इस्लामिक कट्टरवाद्यांनी विविध संघटना तयार केल्या असून, दहशतवाद पसरविण्यात त्यांची भूमिका आहे. संघटनांच्या आडून दहशतवादाला प्रोत्साहन देणारे आणि त्याचे समर्थन करणारे अमेरिकेचे शत्रू आहेत.









