भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने अंतराळात दोन उपग्रहांची गुरुवारी यशस्वी ‘डॉकिंग’ चाचणी करीत नवीन इतिहास रचला आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत अंतराळ डॉकिंगमध्ये प्रभुत्व मिळवणारा चौथा देश ठरला, अशी माहिती इसोने ‘एक्स’वर पोस्ट करीत दिली. मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व इतर मान्यवरांनी इस्रोचे अभिनंदन केले. भारताची महत्त्वाकांक्षी स्पॅडेक्स मोहिमेचे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ३० डिसेंबर रोजी प्रक्षेपण करण्यात आले होते. या मोहिमेत पीएसएलव्ही रॉकेट वापरून सुमारे २२० किलो वजनाचे दोन उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. चेसर आणि टार्गेट असे हे उपग्रह ४७० किलोमीटर उंचीवर इस्रोच्या माध्यमातून यशस्वीपणे ‘डॉक’ करण्यात आले.
भारताच्या अवकाश तंत्रज्ञातील ही कामगिरी उल्लेखनीय आहे. कारण रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनी यापूर्वी अशा गुंतागुंतीच्या स्पेस डॉकिंग तंत्रांमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. त्यानंतर भारताने देखील डॉकिंग प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पूर्ण करून जागतिक स्तरावर अवकाश क्षेत्रात मैलाचा दगड पार केला.
‘स्पॅडेक्स’ तंत्रज्ञान मोहिमांसाठी अत्यावश्यक
भारताच्या डॉकिंग प्रात्यक्षिकांच्या यशस्वी प्रयोगामुळे इथून पुढील अनेक अवकाश मोहिमांमधील उद्दिष्टे पार करण्यास मदत होणार आहे. चंद्रावर भारतीयांचे स्थलांतर, चंद्रावरून नमुने परत करणे, अंतराळ केंद्राची उभारणी आणि ऑपरेशन इत्यादी भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांसाठी हे तंत्रज्ञान आवश्यक आहे.
मोहिमेची उद्दिष्टे
स्पॅडेक्स मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे कमी-पृथ्वी वर्तुळाकार कक्षेत दोन लहान अंतराळयानांच्या चेसर आणि टार्गेट यांची भेट, डॉकिंग आणि अनडॉकिंगसाठी असलेले तंत्रज्ञान विकसित करणे आणि प्रदर्शित करणे. या मोहिमेच्या दुय्यम उद्दिष्टांमध्ये डॉक केलेल्या gath अंतराळयानांमधील विद्युत ऊर्जेच्या हस्तांतरणाचे प्रात्यक्षिक, जे भविष्यातील अंतराळातील रोबोटिक्स, संमिश्र अंतराळयान नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण राहील आणि अनडॉकिंगनंतर पेलोड ऑपरेशन्स अनुप्रयोगांसाठी आवश्यक आहे, असे देखील इस्रोने म्हटले आहे.