श्रीहरिकोटा : २९ जानेवारी बुधवारी पार पाडलेल्या ऐतिहासिक १०० व्या मोहिमेत इस्रोने एक प्रगत नेव्हिगेशन उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला. हा उपग्रह जमीन, आकाश आणि सामुद्री नेव्हिगेशन आणि शेतीसाठी इतर क्षेत्रात अचूक माहिती देईल.
१६ जानेवारी रोजी इसोचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर व्ही. नारायणन् यांच्या नेतृत्वातील तसेच इस्रोची २०२५ मधील ही पहाटे प्रक्षेपित करण्यात आलेली पहिलीच मोहीम आहे. यापूर्वी इस्रोने ३० डिसेंबर २०२४ रोजी स्पेस डॉकिंग प्रयोग यशस्वीरीत्या पार पाडला होता. ते इस्रोचे ९९ वे अभियान होते. यापूर्वी २७.३० तासांची उलटगणना संपताच, स्वदेशी क्रायोजेनिक वरच्या टप्प्यासह ५०.९ फूट उंच भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण वाहन (जीएसएलव्ही) रॉकेट दुसऱ्या प्रक्षेपण केंद्रावरून बुधवारी सकाळी ६.२३ वाजता आग आणि धुराचे लोट मागे सोडत आकाशात झेपावले. जीएलएलव्ही-एफ १५ ही मोहीम जीएसएलव्ही-एफ१२ नंतर हाती घेण्यात आली. यात २९ मे २०२३ मध्ये दुसऱ्या पिढीतील पहिला नेव्हिगेशन उपग्रह एनव्हीएस ०१ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते.
एनव्हीएसचा प्रमुख वापर
एनव्हीएस – ०२ उपग्रहाचा प्रमुख वापर जमीन, आकाश आणि सामुद्री नेव्हिगेशन, अचूक शेती, ताफ्यांचे व्यवस्थापन, मोबाईल उपकरणांमध्ये स्थान आधारित सेवा, उपग्रहांसाठी कक्षा निर्धारण, इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित प्रयोग आणि आपत्कालीन सेवांसाठी केला जाईल.
२९ मिनिटांचा प्रवास
प्रक्षेपणानंतर काळोख्या आणि ढगाळ आकाशात सुमारे १९ मिनिटे प्रवास केल्यानंतर रॉकेटने एनव्हीएस-०२ नेव्हिगेशन उपग्रह यशस्वीरीत्या इच्छित भूस्थिर स्थानांतरण कक्षेत (जीटीओ) वेगळा केला.
नाविक मालिकेतील दुसरा उपग्रह
भारतीय उपखंडातील वापरकर्त्यांना तसेच भारतीय भूभागाच्या पलीकडे सुमारे १५०० किमी अंतरावरील प्रदेशांना अचूक स्थान, वेग आणि वेळ प्रदान करण्यासाठी ‘नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन’ अर्थात् नाविक मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे.
इस्रोची २०२५ मधील पहिली मोहीम यशस्वी ठरली, हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. प्रक्षेपित केल्यावर उपग्रह आवश्यक कक्षेत अचूकपणे ठेवण्यात आला. ही मोहीम म्हणजे १०० वे प्रक्षेपण असून, हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. या मोहिमेचा डेटा आला आहे. सर्व वाहन प्रणाली सामान्य आहे.”
व्ही. नारायणन्, इस्रो अध्यक्ष