श्रीहरीकोटा : भारताचे स्पॅडेक्स उपग्रह पीएसएलव्ही-सी६० मधून सोमवारी अंतराळात प्रक्षेपित केला जाईल. भारताची ही मोहीम प्रक्षेपणासाठी सज्ज असून, सोमवारी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी उपग्रह प्रक्षेपित होणार आहे. भारताला या मिशनद्वारे अंतराळात ‘डॉकिंग’ करण्याची क्षमता साध्य करायची
आहे. अंतराळातील दोन उपग्रह किंवा उपकरणे जोडून नवीन रचना तयार करण्याची ही प्रक्रिया आहे.
इस्रोने एक व्हिडीओ जारी केला, यात अंतराळात ॲनिमेशनद्वारे डॉकिंग कसे होते, हे दाखवले आहे. पीएसएलव्ही-सी६० स्पॅडेक्स स्वतंत्रपणे प्रक्षेपित केल्यानंतर दोन उपग्रह अवकाशात एकत्र कसे येतील, ते इस्रोने शेअर केलेल्या व्हिडीओत दाखवण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास स्पॅडेक्स भारताला अमेरिका, रशिया आणि चीनच्या बरोबरीने अंतराळात डॉकिंग करण्यास सक्षम असलेल्या काही राष्ट्रांपैकी एक म्हणून स्थान देईल.
स्पॅडेक्स मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट दोन लहान अंतराळयानांच्या माध्यमातून डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्र विकसित करणे आणि प्रदर्शित करणे हे आहे. लंबवर्तुळाकार कक्षेत फिरताना हे दोन उपग्रह एकमेकांशी जोडले जातील. स्पॅडेक्स मोहिमेतील या उपग्रहांचे वजन सुमारे २२० किलो असेल. हे एकाच वेळी पीएसएलव्ही-सी ६० रॉकेटद्वारे ५५ओ वर झुकलेल्या कक्षेत ४७० किमी उंचीवर सोडले जातील. प्रक्षेपणानंतर दोन्ही वाहने १०-२० किमी अंतर राखून हळूहळू एकमेकांच्या जवळ येतील. या प्रक्रियेत लक्ष्य वाहन आणि चेझर वाहन यांच्यातील वेग नियंत्रित करीत डॉकिंग प्रक्रिया पूर्ण करता येईल.