श्रीहरिकोटा : इस्रोने सोमवारी रात्री स्पॅडेक्स अंतराळयान प्रक्षेपित केल्यानंतर ते यशस्वीपणे विभक्त करून निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यात आले. आता इस्रोची नजर डॉकिंग आणि अनडॉकिंगच्या प्रयोगावर आहे.
पीएसएलव्ही-सी ६० मोहीम स्पॅडेक्स अंतराळयानाच्या रूपात पूर्ण झाली, असे मोहिमेचे संचालक एम. जयकुमार यांनी सांगितले. प्रक्षेपण झाल्यावर १५ मिनिटांनी रॉकेटने उपग्रहांना ४७५ किमीच्या गोलाकार कक्षेत योग्य ठिकाणी पोहोचवले, असे इसोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले.
रॉकेटने अंतराळयान निर्धारित कक्षेत स्थापन केले. आता स्पॅडेक्स उपग्रह एकामागोमाग निघाले. वेळेनुसार ते पुढील अंतर कापतील. एकमेकांपासून जवळपास २० किमी दूर जातील आणि नंतर डॉकिंग प्रक्रिया सुरू होईल. डॉकिंग प्रक्रिया एक आठवड्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे आणि याची निर्धारित वेळ जवळपास ७ जानेवारीची असेल, असे सोमनाथ यांनी सांगितले.
या मोहिमेत पीओईएम-४ हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यावर स्टार्टअप्स, उद्योग, शिक्षण क्षेत्र आणि इस्रोच्या केंद्रांचे २४ पेलोड्स आहेत. मंगळवारी सकाळी हे पेलोड्स डागण्याचे ठरवले होते. कार्य सुरू करण्यासाठी पीओईएम-४ निर्धारित कक्षेत पोहोचतील, हे सुनिश्चित करण्यासाठी संशोधकांना रात्रभर काम करावे लागणार आहे, असे सोमनाथ म्हणाले.
ते पेलोड्स आहेत उपग्रह नाही. पुढील दोन महिने प्रयोग करण्यासाठी ते पीएसएलव्हीच्या दुसऱ्या टप्प्यात जोडण्यात आले होते. पीएसएलव्ही रॉकेटच्या वरच्या टप्प्याला खाली ३५० किमीच्या कक्षेत आणले जाईल आणि सध्या ही प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर आमच्याकडे सुरू ठेवण्यासाठी अनेक उपक्रम असतील, असे सोमनाथ यांनी सांगितले.
जानेवारीत जीएसलव्हीचे १०० वे प्रक्षेपण
श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रावरून १०० व्या प्रक्षेपणासाठी जानेवारीत नियोजित भूस्थिर प्रक्षेपण वाहन मोहिमेवर महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्याची तयारी इसो करीत आहे. श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केलेली पीएसएलव्ही-सी ६० ही ९९ वी मोहीम होती. या माध्यमातून अंतराळात डॉकिंग प्रयोगासाठी दोन अंतराळयान गोलाकार कक्षेत स्थापित करण्यात आले, असे सोमनाथ यांनी सांगितले.