मुंबई : ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ला रामसेतूचा सुधारित समुद्राखालील अचूक नकाशा प्रसिद्ध करण्यात यश आले आहे. भारताचे दक्षिणेकडील टोक असलेल्या धनुष्यकोडीपासून श्रीलंकेतील तलाईमन्नारपर्यंत या सेतूचा नकाशा ‘इस्रो’ने प्रसिद्ध केला आहे. हा नकाशा तयार करण्यासाठी ‘इस्रो’ने अमेरिकेच्या उपग्रहाचेदेखील सहकार्य घेतले. अमेरिकन उपग्रहाच्या साहाय्याने समुद्रतळावर लेझरच्या माध्यमातून सेतूचे प्रतिबिंब मिळवणे ‘इस्रो’ला सोपे गेले. एकूण २९ किमीचा चुनखडी असणारा सेतू ९९.९८ टक्के समुद्रात बुडाला असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
तसेच या सेतूच्या पाण्याखालील भागाविषयी माहिती देणारे हे पहिलेच संशोधन असल्यामुळे उल्लेखनीय ठरते. रामसेतूला ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने ‘अॅडम्स ब्रिज’ असे संबोधले होते. रामायणामध्ये लंकेवर स्वारी करताना प्रभू रामचंद्रांनी वानरसेनेच्या मदतीने हा सेतू बांधल्याने ‘रामसेतू’ असे नाव भारताने दिले आहे. हा सेतू एकेकाळी भारत आणि श्रीलंकेला जोडणारा मार्ग होता. नवव्या शतकात पर्शियन प्रवाशांनी या सेतूला ‘सेतू बंधाई’ असे संबोधले होते.
रामेश्वर मंदिरातील एका नोंदीनुसार, १४८० पर्यंत हा सेतू समुद्राच्या पातळीवर होता. मात्र, नंतर झालेल्या एका वादळामुळे हा सेतू पाण्याखाली गेला. यापूर्वी झालेल्या संशोधनातून रामसेतूच्या खाली ११ अरुंद, निमुळत्या फटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या फटींमधून सेतूच्या नैर्ऋत्येकडील मन्नारचे आखात आणि ईशान्येकडील पाल्कच्या सामुद्रधुनीतील पाणी प्रवाहित होते. तसेच रामसेतूखालील या अरुंद फटी अवरोधाचे परिणाम कमी करत असल्याचेदेखील शास्त्रज्ञांचे मत आहे.रामसेतूच्या मुद्द्यावरून देशात दीर्घकाळ राजकारणही करण्यात आले. रामसेतूवर आणि एकूणच प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वावरदेखील शंका उपस्थित करण्याचे प्रयत्नदेखील करण्यात आले. त्यामुळे ‘इस्रो’चे हे संशोधन निश्चितच या सर्व शंकांचे निरसन करणारे ठरणार आहे.
रामसेतूविषयी आजवरची काही ठळक निरीक्षणे
रामसेतूच्या समुद्राखालील संशोधनासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाकडून २०२१ साली प्रारंभ.
दक्षिणेतील अण्णा विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून रामसेतू १८ हजार ४०० वर्षे जुना असल्याचा निष्कर्ष.
‘अमेरिकन सायन्स चॅनल’ने रामसेतू मानवनिर्मित असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे.