---Advertisement---
भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी बुधवारी घोषणा केली की भारताचे लक्ष्य २०४० पर्यंत चंद्रावर आपल्या नागरिकांना उतरवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे आहे. याव्यतिरिक्त, भारताचे पहिले मानवयुक्त अंतराळ यान म्हणजेच गगनयान हे २०२७ मध्ये प्रक्षेपित होईल. नारायणन यांनी रांची येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मेसरा येथील ३५ व्या दीक्षांत समारंभात हे विधान केले.
गगनयान मोहिमेच्या तयारीला वेग
नारायणन यांनी सांगितले की गगनयान मोहिमेची तयारी वेगाने सुरू आहे. या मोहिमेपूर्वी तीन मानवरहित मोहिमा असतील. पहिले अभियान डिसेंबर २०२५ मध्ये होईल, ज्यामध्ये अर्ध-मानवयुक्त रोबोट व्योमित्र अवकाशात प्रक्षेपित होईल. त्यानंतर २०२६ मध्ये आणखी दोन मानवरहित मोहिमा होतील. नारायणन म्हणाले, “भारताचे पहिले मानवयुक्त अंतराळयान, गगनयान, २०२७ च्या पहिल्या तिमाहीत पूर्ण होईल.”
‘२०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक’
इस्रो प्रमुखांनी सांगितले की, २०३५ पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक, भारतीय अंतराळ स्थानक (BAS) असेल. त्याचे सुरुवातीचे मॉड्यूल २०२७ पर्यंत अवकाशात तैनात केलं जाऊ शकतं. याव्यतिरिक्त, चंद्रयान-४, चंद्रयान-५, एक नवीन मंगळ मोहीम आणि XOM, एक खगोलीय वेधशाळा मोहीम यासारखे मोठे प्रकल्प देखील तयार होत आहे. नारायणन म्हणाले की, शुक्राचा अभ्यास करण्यासाठी व्हीनस ऑर्बिटर मिशनला मान्यता देण्यात आली आहे. शिवाय, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य-L1 मोहिमेने आतापर्यंत १५ टेराबाइट्सपेक्षा जास्त डेटा गोळा केला आहे, ज्यामुळे सौर क्रियाकलाप आणि अवकाश हवामान समजून घेण्यास मदत होत आहे.
३०० स्टार्टअप्स सॅटलाइट अवकाशात काम करताय
इस्रो प्रमुखांनी सांगितले की, भारत अवकाश क्षेत्रात स्वावलंबनावर भर देत आहे, परंतु हवामान विज्ञान आणि अवकाश संशोधनासारख्या जागतिक मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी खुला आहे. नारायणन यांनी स्पष्ट केले की, भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि अधिकृतता केंद्र (IN-SPACE) ने खाजगी कंपन्या आणि स्टार्टअप्सना जोडून अवकाश क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. काही वर्षांपूर्वी काही मोजकेच स्टार्टअप्स होते, परंतु आज ३०० हून अधिक स्टार्टअप्स सॅटलाइट विकास, प्रक्षेपण सेवा आणि अंतराळ डेटा विश्लेषणात गुंतलेले आहेत. हे स्टार्टअप्स शेती, आपत्ती व्यवस्थापन, दूरसंचार, रेल्वे आणि वाहन देखरेख आणि मत्स्यपालन यासारख्या क्षेत्रात मदत करत आहेत.
प्रक्षेपण क्षमता वाढवण्याची तयारी सुरू
भारत चंद्रावर मानवी मोहिमेसारखे मोठे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपली प्रक्षेपण क्षमता वाढवत आहे. नारायणन म्हणाले, “आम्ही सुरुवातीला ३५ किलो वजनाचे सॅटलाइट प्रक्षेपित केले होते, परंतु आता आम्ही ८०,००० किलो पर्यंत क्षमता विकसित करत आहोत.” यासाठी, श्रीहरिकोटा येथे तिसरा प्रक्षेपण पॅड बांधला जात आहे, ज्याचा खर्च अंदाजे ₹४,००० कोटी आहे.
इस्रोची कामगिरी अभिमानास्पद
नारायणन यांनी अभिमानाने सांगितले की चांद्रयान-१ ने चंद्रावर पाणी शोधले आणि चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पहिले सॉफ्ट लँडिंग केले. भारताने अलिकडेच ‘स्पॅडेक्स’ मोहिमेद्वारे अवकाशात डॉकिंग आणि अनडॉकिंग क्षमता साध्य केली आहे, आणि ही कामगिरी करणारा भारत चौथा देश बनला आहे. शिवाय, श्रीहरिकोटा येथून १०० वे प्रक्षेपण (GSLV F15/NVS-02 मिशन) देखील पूर्ण झाले आहे.
एआय आणि रोबोटिक्सचे भविष्यात मोठे फायदे
नारायणन म्हणाले की एआय, रोबोटिक्स आणि बिग डेटा हे अंतराळ मोहिमांचे भविष्य आहे. ते म्हणाले, “ज्याप्रमाणे ३५ वर्षांपूर्वी कोणीही संगणक क्रांतीची कल्पना करू शकत नव्हते, त्याचप्रमाणे एआय आणि रोबोटिक्स अवकाश संशोधनाच्या पुढील टप्प्याला आकार देतील.” इस्रो प्रमुखांनी निदर्शनास आणून दिले की भारताकडे तारापूर आणि भाभा अणु संशोधन केंद्रासह आठ प्रमुख अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये २३ अणुभट्ट्या आहेत. नारायणन म्हणाले की भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि अवकाश क्षेत्रातील नऊ क्षेत्रांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.