---Advertisement---

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक आहे – सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

by team

---Advertisement---

संघाचा देशव्यापी विस्तार आणि समाजातील स्वयंसेवकांचे एकत्रीकरण सुरू झाले. पुढील चार दशके संघाच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट पद्धतीने कार्य करून आपल्या कर्तृत्व, आपुलकी आणि नैतिकतेच्या आधारे समाजाचा विश्वास संपादन केला आणि १९९० नंतर या विचारसंपत्तीच्या व गुणसंपत्तीच्या आधारावर देश चालवता येतो, हे सिद्ध करून दाखवले. आता यापुढे आपले करणीय कार्य म्हणजे हाच विचार आणि हीच गुणवत्ता स्वीकारून संपूर्ण समाजाने सर्व भेद विसरून प्रामाणिकतेने आणि निःस्वार्थ बुद्धीने देशासाठी स्वतःहून कामाला लागणे आणि देशाला महान बनवणे.

१) संघाचे स्वयंसेवक आणि सरसंघचालक या नात्याने संघाच्या १०० वर्षाच्या प्रवासाकडे आपण कसे पाहता?

डॉ. हेडगेवारांनी संघाचे कार्य खूप विचार करून सुरू केले. देशासमोर उभ्या ठाकलेल्या अडचणींवर उपाय काय असावा, हे प्रयोगांच्या आधारे निश्चित केले गेले आणि तो उपाय अचूक ठरला. संघाच्या कार्यपद्धतीनुसार काम पूर्ण होऊ शकते आणि त्या मार्गावर चालत असताना येणाऱ्या आव्हानांवर मात करून संघ पुढे जाऊ शकतो, हे अनुभवजन्यपणे सिद्ध होण्यासाठी १९५० पर्यंतचा काळ लागला. त्यानंतर संघाचा देशव्यापी विस्तार आणि समाजातील स्वयंसेवकांचे एकत्रीकरण सुरू झाले. पुढील चार दशके संघाच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट पद्धतीने कार्य करून आपल्या कर्तृत्व, आपुलकी आणि नैतिकतेच्या आधारे समाजाचा विश्वास संपादन केला आणि १९९० नंतर या विचारस्संपत्तीच्या व गुणसंपत्तीच्या आधारावर देश चालवता येतो, हे सिद्ध करून दाखवले. आता यापुढे आपले करणीय कार्य म्हणजे हाच विचार आणि हीच गुणवत्ता स्वीकारून संपूर्ण समाजाने सर्व भेद विसरून प्रामाणिकतेने आणि निःस्वार्थ बुद्धीने देशासाठी स्वतःहून कामाला लागणे आणि देशाला महान बनवणे.

२) १०० वर्षांच्या या प्रवासात महत्त्वाचे टप्पे कोणते होते?

संघाकडे तेव्हा काहीही नव्हते. विचारांना मान्यता नव्हती, प्रचाराचे कोणतेही साधन नव्हते, समाजात केवळ उपेक्षा आणि विरोधच होता, कार्यकर्ते नव्हते. ही सगळी माहिती संगणकात प्रविष्ट केली असती, तर त्याने भविष्यवाणी केली असती की, हा संघ जन्मताच मरण पावणार आहे. परंतु फाळणीच्या वेळी हिंदूंच्या रक्षणाचे मोठे आव्हान होते आणि ‘संघावरील बंदी’सारखी कठीण आपत्ती ओढवली होती. तरीही संघ यशस्वीपणे त्या सगळ्यांतून बाहेर आला आणि १९५० पर्यंत हे सिद्ध झाले की संघाचे काम चालणारच, वाढणारच. या पद्धतीने हिंदू समाजाचे संघटन करता येईल, हे स्पष्ट झाले. पुढे संघाचा विस्तार पूर्वपिक्षाही अधिक झाला. १९७५ च्या आणिबाणीच्या काळात संघाने बजावलेल्या भूमिकेमुळे या संघशक्तीचे महत्त्व समाजाच्या लक्षात आले. पुढे एकात्म रथयात्रा, काश्मीरबाबत समाजात जनजागृती, श्री राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन आणि स्वामी विवेकानंद सार्धशति यासारख्या मोहिमांद्वारे आणि सेवाकार्यांच्या मोठ्या प्रमाणात विस्तारामुळे, संघाची विचारसरणी आणि संघाबद्दलची विश्वासार्हतेची भावना समाजात मोठ्या प्रमाणात विस्तारली.

३) १९४८ आणि १९७५ मध्ये संघावर जे संकट आले, त्यातून संघटनेने काय शिकले?

या दोन्ही बंदीमागे राजकारण होते. बंदी लावणाऱ्यांनाही माहिती होते की संघामुळे काही नुकसान नाही: उलट संघामुळे फायदाच आहे. इतक्या मोठ्या समाजात स्वाभाविकपणे चालणाऱ्या विचारांच्या स्पर्धेमध्ये आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सत्ताधान्यऱ्यांनी संघावर बंदी घातली. पहिल्या बंदीच्या वेळी सर्व परिस्थिती संघाच्या विरोधात होती. संघाचा अंत होईल असेच वाटत होते. परंतु सर्व प्रतिकूलतेनंतरही संघ त्या बंदीतून बाहेर पडला आणि पुढील १५-२० वर्षांत पूर्ववत होऊन पूर्वपिक्षाही पुढे गेला. संघाचे स्वयंसेवक, जे फक्तद शाखा चालवत होते आणि समाजाच्या उपक्रमांमध्ये फारसे सहभागी नव्हते, त्यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये सहभागी होऊन तिथे आपली भूमिका निश्चित केली. १९४८ च्या बंदीमुळे संघाला हा लाभ झाला की, आम्ही आपल्या सामर्थ्याला ओळखले आणि समाजात व व्यवस्थांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी स्वयंसेवकांनी योजनाबद्धपणे पुढाकार घेतला. संघाच्या विचारांत आधीपासूनच ठरलेले होते की, संघाचे कार्य केवळ एका तासाच्या शाखेपुरते मर्यादित नाही, तर उरलेल्या २३ तासांतील वैयक्तिक, कौटुंबिक, सार्वजनिक आणि उपजीविकेच्या क्रियाकलापांतही संघाचे संस्कार व्यक्त होणे गरजेचे आहे. पुढे १९७५ च्या बंदीदरम्यान समाजाने संघाच्या या वाढलेल्या कार्यक्षेत्राची शक्ती अनुभवली. जेव्हा चांगले चांगले लोकही निराश होऊन बसले होते, तेव्हा एक सामान्य स्वयंसेवकसुद्धा आत्मविश्वासाने विचार करत होता की, हे संकट जाईल आणि आपण सारे यातून सुखरूप बाहेर पडू. १९७५ च्या आणिबाणीच्या काळात संघाने आपल्यावर लादलेली बंदी मुद्दा न बनवता लोकशाहीच्या रक्षणासाठी कार्य केले. संघावर टीका करणाऱ्यांनाही त्यावेळी साथ दिली. त्या काळात समाजात, विशेषतः विचारवंतांमध्ये, संघाची एक विश्वासार्ह वैचारिक ध्रुव म्हणून ओळख निर्माण झाली. आणिबाणीच्या नंतर संघ अधिकच बलाढ्य होऊन बाहेर आला.

४) भौगोलिक आणि संख्यात्मक दृष्टिकोनातून संघाचा विस्तार होत गेला. तरीही गुणवत्तापूर्ण कार्य आणि स्वयंसेवकांचे दर्जात्मक प्रशिक्षण करण्यात संघ यशस्वी ठरला आहे. याची कारणे काय आहेत?

गुणवत्ता आणि संख्येमध्ये जर फक्त गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला आणि संख्या वाढवणार नाही किंवा फक्त संख्या वाढवाल आणि गुणवत्ता जपणार नाही, तर ना गुणवत्ता टिकेल ना संख्या. ही गोष्ट लक्षात घेऊन संघाने सुरुवातीपासूनच याकडे लक्ष दिले आहे की, संघाने संपूर्ण समाजाला संघटित करायचे आहे. पण ‘संघटित करणे’ याचा एक विशेष अर्थ आहे. एखाद्या व्यक्तीला कसे तयार करायचे, या सगळ्या व्यक्तींना संघटित करण्याची रचना कशी असावी. ‘आपण’ ही भावना कशी तयार व्हावीः पासाठी काही निकष पूर्वीपासूनच निश्चित केले आहेत. त्या निकषांवर कुठलीही तडजोड न करता, त्या निकषांना न तोडता संख्या वाढवायची आहे. याचा अर्थ लोकांना संघटनेच्या बाहेर ठेवायचे नाही. एका मोठ्या संघटनेच्या सुरुवातीच्या काळातले एक उदाहरण आहे. त्या संघटनेत मूळ समाजवादी विचारधारेचे एक व्यक्ती कार्यकर्ता झाले. त्यांना सतत सिगारेट पिण्याची सवय होती. ते प्रथमच एका अभ्यास वर्गात आले. सिगारेट तर दूरच, तिथे सुपारी खाणारासुद्धा कुणी नव्हता. ते दिवसभर बेचैन होते. रात्री झोपही लागत नव्हती. तेवढ्यात संघटन मंत्री आले आणि म्हणाले, ‘झोप येत नसेल तर बाहेर जाऊ या, थोडा फेरफटका मारूया.’ ते त्यांना घेऊन बाहेर गेले आणि सांगितले, ‘पुढे चौकात सिगारेट मिळेल. मनसोक्त पी आणि परत ये. वर्गात मात्र सिगारेट मिळणार नाही. ते नवीन कार्यकर्ते तिथे टिकले, उत्तम कार्यकर्ते बनले आणि सिगारेटही सुटली. त्यांनी त्या प्रदेशात त्या संघटनेला खूप उंचीवर नेले. व्यक्ती जशी आहे, तशी स्वीकारायची हा लवचीकपणा आमच्याकडे (संघाकडे) आहे. पण आम्हाला जशी हवी आहे, तशी ती व्यक्ती घडवण्याचे आत्मीयतेचे कौशल्य आमच्याकडे आहे. ती हिंमत आणि ताकद आमच्याकडे आहे. यामुळेच संख्या वाढवतानाही गुणवत्ता टिकवून राहिली. आम्हाला गुणवत्ता हवी आहे, पण आम्हाला संपूर्ण समाजालाच गुणवत्तापूर्ण बनवायचे आहे, याचे भान आमच्याकडे आहे.

५) संघ आजही डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुर्जीच्या मूळ विचारांनुसारच कार्य करतोय. परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार यात कसे बदल केले आहेत?

डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजी आणि बाळासाहेब यांचे विचार सनातन परंपरा किंवा संस्कृतीपासून वेगळे नाहीत. सखोल चिंतन आणि कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष प्रयोगांच्या अनुभवांमधून संघाची कार्यपद्धती ठरली आणि आजही चालू आहे. पूर्वीपासूनच त्यात पोथीनिष्ठा, व्यक्ति निष्ठा किंवा अंधानुकरणाला कोणतेही स्थान नाही. आपण तत्त्वप्रधान आहोत. महापुरुषांच्या गुणांचे, त्यांनी दाखवलेल्या दिशेचे अनुसरण करायचे असते, परंतु प्रत्येक देश-काल-परिस्थितीत आपला मार्ग स्वतः तयार करून त्यावर चालायचे असते. म्हणूनच नित्य आणि अनित्य यामधील विवेक असायला हवा. संघात नित्य काय आहे? एकदा बाळासाहेबांनी म्हटले होते की, ‘हिंदुस्थान ‘हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे’ – या विधानाव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टी संघात बदलू शकतात. संपूर्ण हिंदू समाज हा या देशाचा उत्तरदायी समाज आहे. या देशाचा स्वभाव आणि संस्कृती ही हिंदूंचीच संस्कृती आहे. म्हणूनच हे हिंदू राष्ट्र आहे. ही गोष्ट निश्चित ठेवूनच सर्व काही करायचे आहे. स्वयंसेवकाच्या प्रतिज्ञेमध्ये ‘आपला पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाजाचे संरक्षण करत हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी’ काम करण्याचे उद्दिष्ट सांगितले आहे. ‘हिंदू’ ही संज्ञा व्यापक आहे. त्या चौकटीत राहून, आपली दिशा कायम ठेवून देश-काल-परिस्थितीनुसार परिवर्तन करत पुढे जाण्याची पूर्ण मुभा आहे. प्रतिज्ञेमध्ये ‘मी संघाचा घटक आहे’ असेही म्हटले जाते. घटक म्हणजे संघ घडवणारा, संघाचे लघुरूप आणि संघाचा अभिन्न भाग. म्हणूनच वेगवेगळ्या मतांच्या लोकांना चर्चेमध्ये आपले विचार मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. एकदा सहमतीने निर्णय झाला की, सर्वजण आपापले मत त्या निर्णयात विलीन करून एकाच दिशेने चालतात. जो निर्णय होतो, तो मान्य करायचा असतो. त्यामुळे सर्वांना कार्य करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि सर्वांची दिशा एकसंध आहे. आपण नित्य गोष्टी कायम ठेवतो आणि अनित्य गोष्टी देश-काल-परिस्थितीनुसार बदलत जातो.

६) संघाला ज्यांनी बाहेरून पाहिलं आहे, ज्यांना अनुभव नाही, त्यांना संघटनेचा डांचा समजतो. पण इतकी लांब यात्रा करत असताना विचार-विमर्श आणि आत्मचिंतनाची प्रक्रिया कशी असते?

त्याची एक पद्धती तयार करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये उद्दिष्ट आणि आशय निश्चित आहे. पण तो आशय पोहोचवण्याची पद्धती वेगवेगळी असू शकते. संरचना बदलू शकते, परंतु त्या संरचनेच्या आत काय आहे, ते ठाम आणि अढळ आहे. परिस्थितीबरोबरच मनः स्थितीचाही महत्त्वाचा भाग असतो. म्हणूनच आपल्या प्रशिक्षणांमध्ये देशाची स्थिती, आव्हाने इत्यादींचा विचार केला जातो. त्याचबरोबर त्या संदर्भात स्वयंसेवक कसा असावा, संघटना कोणत्या गुणांच्या आधारावर उभी राहते, स्वतःमध्ये त्या गुणांचा विकास करण्यासाठी आपण काय करतो, यांचाही विचार केला जातो. प्रार्थनमध्ये आपल्या सामूहिक संकल्पाचे आणि प्रतिज्ञेमध्ये प्रत्येक स्वयंसेवकाच्या वैयक्तिक संकल्पाचे दररोज स्मरण केले जाते. स्वयंसेवक म्हणजे स्वतः पासून प्रारंभ करणारा-असा त्याचा अर्थ आहे. ‘संघाचा घटक’ या शब्दाचा अर्थ आहे – ‘जसा मी आहे. तसाच संघ आहे आणि जसा संघ आहे, तसाच मी आहे. जसे समुद्रातील प्रत्येक थेंब समुद्रासारखाच असतो आणि त्या सर्व थेंबांनीच समुद्र तयार होतो, तसेच हे ‘एक’ आणि ‘पूर्ण’ यांचे नाते संघात सुरुवातीपासूनच आहे. स्वयंसेवकाचे आत्मचिंतन सतत चालू असते. यशाचे श्रेय संपूर्ण संघाचे असते. अपयश आल्यास ‘मी कुठे कमी पडलो?’ हे प्रत्येक स्वयंसेवक स्वतःला विचारतो. हाच संघाच्या स्वयंसेवकांचा प्रशिक्षणाचा मूलभाव आहे.

७) समाज बदलला, जीवनशैली बदलली, मग आजच्या परिस्थितीत संघाची दैनंदिन शाखा पद्धत तितकीच प्रभावी आहे का किंवा यासाठी काही पर्यायी व्यवस्था देखील आहे का?

शाखेच्या कार्यक्रमांचे पर्याय असू शकतात आणि त्यांना आम्ही स्वीकारतो. पण शाखा हे जे तत्त्व आहे एकत्र येणे, सद्‌गुणांची सामूहिक उपासना करणे आणि दररोज मनामध्ये हा संकल्प जागवणे की आपण मातृभूमीसाठी काम करत आहोत, परमवैभवासाठी काम करत आहोत, हा जो पाया आहे, एकमेकांशी भेटणे, सहकार्य करणे हे मूलभूत आहे. याला पर्याय नाही. सामान्य माणूस सामान्य असतो. तो असामान्य तेव्हाच होतो, जेव्हा तो जोडलेला असतो आणि मग तोच सामान्य माणूस असामान्य काम करतो. असामान्य त्याग करतो. पण त्यासाठी एक वातावरण असावे लागते आणि त्या वातावरणाशी जोडलेले असले पाहिजे. उदाहरण आणि आत्मीयता, हेच परिवर्तनाचे खरे कारण आहेत, दुसरे काही नाही, जगात कुठेही जा, जेव्हा जेव्हा परिवर्तन होते, तेव्हा एक मॉडेल असते, ज्यामध्ये प्रथम स्वतःमध्ये परिवर्तन करावे लागते आणि ते पाहून इतरांमध्ये परिवर्तन होते. हे दूर राहून होत नाही; आप्त असावे लागते, जवळ असावे लागते. महापुरुष खूप आहेत, आपण त्यांना ओळखतो, त्यांच्या प्रति श्रद्धा आणि सन्मानही आहे. पण मी ज्या व्यक्तीच्या संगतीत असतो, तो जसा चालतो. मी तसाच चालतो. मी तेच करतो, ज्याची संगत मला लाभलेली असते. माझा स्वतःचा मित्र, पण माझ्यापेक्षा थोडा चांगला असेल, तर मी त्याचेच अनुकरण करतो. हेच परिवर्तनाचे सिद्ध झालेले तंत्र आहे. या तत्त्वामध्ये अजूनपर्यंत कोणताही बदल झालेला नाही आणि तोपर्यंत शाखेचा दुसरा कोणताही मॉडेल नाही. कार्यक्रम आणि इतर सगळे बदलू शकतात; शाखेचा वेळ बदलतो, वेश बदलतो. शाखेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करण्याची मुभा पूर्वीपासूनच आहे. पण शाखेला पर्याय नाही. शाखा कधीही अप्रासंगिक होत नाही. आज आपल्या शाखा मॉडेलबद्दल प्रगत देशांतील लोक येऊन अभ्यास करत आहेत, त्याबद्दल विचारपूस करीत आहेत. दर १० वर्षांनी आपण चिंतन करतो की, काही दुसरा पर्याय आहे का? अशा चिंतनांमध्ये मी आजपर्यंत ६-७ वेळा सहभागी झालो आहे. पण जे आपल्याला करायचे आहे, ते करणारा कोणताही पर्याय आजपर्यंत सापडलेला नाही.

८) संघ वनवासी क्षेत्रात कशाप्रकारे वाढतोय?

वनवासी क्षेत्रातील पहिले काम म्हणजे जनजाती बांधवांना सक्षम बनवणे, त्यांची सेवा करणे. त्यानंतर हेही जोडले गेले की त्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे. मात्र आमची इच्छा आहे की, जनजाती समाजातून असे नेतृत्व उभे राहावे जे आपल्या समाजाची चिंता करील आणि ‘आम्ही संपूर्ण राष्ट्रजीवनाचा अविभाज्य भाग आहोत’ हे समजून समाजाला पुढे नेईल. या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या वाढत आहे. ‘जनजाती म्हणजे कोण?’, ‘त्यांच्या मूळ जडणघडणी काय आहे?’, ‘जनजाती समाजातून निर्माण झालेले महापुरुष’, ‘स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणारे जनजाती नायक’ या सर्व बाबतीत त्यांना शिक्षित करत हळूहळू राष्ट्रीय सुरात बोलणारे, योगदान देणारे कार्यकर्ते आणि नेतृत्व त्या ठिकाणी उभे राहावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ईशान्य भारताबरोबरच इतर जनजाती भागांमध्येही संघाच्या शाखांची संख्या वाढत आहे.

९) भारताच्या शेजारील देशांमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्यांच्या विरोधात हिंसा केली जाते. जगात मानवाधिकारांची काळजी घेणारे लोक हिंदूबाबत अशीच काळजी घेत आहेत का? संघाच्या प्रतिनिधी सभेतही हा विषय मांडण्यात आला आहे. या विषयावर आपले काय मत आहे?

हिंदूंविषयी चिंता तेव्हा असेल जेव्हा हिंदू समाज सशक्त बनेल. कारण हिंदू समाज आणि भारत देश हे एकमेकांशी जोडलेले आहेत. हिंदू समाजाचे उत्तम स्वरूप भारतालाही एक महान देश बनवेल आणि जो स्वतःला भारतात हिंदू म्हणत नाही, त्यालाही सोबत घेऊन चालू शकेल. कारण तो देखील मूळतः हिंदूच आहे. भारतातील हिंदू समाज सामर्थ्यवान झाला, तर जगभरातील हिंदूंनाही आपोआपच सामर्थ्य प्राप्त होईल. हे काम सुरू आहे. पण अजून पूर्ण झालेले नाही. हळूहळू ती स्थिती निर्माण होत आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी यावेळी जितका आक्रोश व्यक्त झाला, तसा याआधी कधीच झाला नव्हता. इतकेच नव्हे, तर तिथल्या हिंदूंनी हेही ठामपणे सांगितले आहे की, ते पळून जाणार नाहीत, तर तिथेच राहून आपले हक्क मिळवतील. आता हिंदू समाजाचे अंतर्गत सामर्थ्य वाढत आहे. एक प्रकारे संघटन वाढत आहे आणि त्याचे परिणाम आपोआप दिसून येतील. तोपर्यंत त्यासाठी संघर्ष करावा लागेल. जगात जिथे जिथे हिंदू आहेत, तिथे त्यांच्या हितासाठी हिंदू संघटनेच्या नात्याने आपली मर्यादा राखून जे काही करता येईल, ते सर्व काही करण्यासाठीच संघ आहे. स्वयंसेवकाची प्रतिज्ञाही आहे ‘धर्म, संस्कृती आणि समाजाचे संरक्षण करून राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करणे.’

१०) जागतिक व्यवस्थेत लष्करी शक्ती, राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक शक्ती यांचे स्वतःचे महत्त्व आहे. संघाचे याबद्दल मत काय?

बलशाली होणे हे अपरिहार्य आहे. संघाच्या प्रार्थनेत एक ओळ आहे- ‘अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं.’ आपल्यावर कोणीही विजय मिळवू शकणार नाही, इतके सामर्थ्य आपल्यात असलेच पाहिजे. सुरक्षेच्या बाबतीत आपण कोणावरही अवलंबून राहू नये. आपली सुरक्षा आपण स्वतः करायला हवी, आपल्याला कोणीही जिंकू शकणार नाही, संपूर्ण जग एकत्र आले तरी आपल्याला हरवू शकणार नाही, इतके सामर्थ्य आपल्याकडे असले पाहिजे. कारण जगामध्ये काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत, जे स्वभावानेच आक्रमक आहेत. सज्जन व्यक्ती केवळ सज्जनतेमुळे सुरक्षित राहत नाही. सज्जनतेसोबतच शक्तीही आवश्यक आहे. केवळ शक्ती असेल, पण दिशा नसेल, तर ती हिंसेचे कारण बनते. म्हणूनच शक्तीसोबत सज्जनतेची जोड आवश्यक आहे. या दोघांची साधना आपल्याला करावी लागेल. भारत अजेय व्हावा. “परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्’ असा सामर्थ्यवान देश व्हावा.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment