जळगाव : जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने सन २०१३ पासून ऑनलाईन नावनोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे आणि आता इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आल्याचे निर्देश मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहे.
विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उमेदवार आता घरबसल्या सहजपणे आपली नावनोंदणी करू शकतात. नावनोंदणीनंतर उमेदवारांना युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल, ज्याच्या मदतीने ते शासकीय आणि खाजगी आस्थापनांमधील रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतील. यासोबतच, विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या इतर सोई-सुविधा आणि माहितीचा लाभ घेणे देखील त्यांना शक्य होणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी या ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हावे. नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना या विभागाच्या माध्यमातून आयोजित होणारे रोजगार मेळावे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि कौशल्य विकास प्रशिक्षण यांसारख्या इतर सेवांचा लाभ घेता येणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रक्रियेबाबत कोणत्याही अडचणी असल्यास, उमेदवारांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सार्वजनिक सुट्ट्या वगळून) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय आवार, जी.एस. ग्राऊड शेजारी, जळगाव येथे सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा, असे आवाहनही संदीप गायकवाड यांनी केले आहे.