मुंबई : ग्राहक म्हणून कायम जागरूक आणि सतर्क राहणे आवश्यक आहे, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना दिला आहे. मंगळवार, २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत राज्यातील नागरिकांना काही सूचना दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “२४ डिसेंबर हा आजचा दिवस आपण ‘राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन’ म्हणून संपूर्ण देशभर साजरा करीत असतो. या दिनाचे औचित्य साधून काही महत्वाच्या बाबी अधोरेखित होणे गरजेचे आहे. ग्राहक म्हणून आपण सदोदित जागरूक आणि सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणत्याही वस्तू खरेदी करताना आपण खरेदी केलेल्या वस्तूंच्या किंमती (M.R.P.), त्या वस्तूंची मुदत संपण्याची तारीख (expiry date), वजन इत्यादी गोष्टी तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
जागो ग्राहक जागो!
ते पुढे म्हणाले की, “खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये काही दोष असल्यास आपल्या मुला-बाळांना त्याची बाधा होऊ शकते. म्हणूनच खरेदी केलेल्या वस्तूंची पावती घेण्याची सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे. ‘ग्राहक राजा’ आहे असे नुसते बोलून चालणार नाही, तर तेवढीच जागरूकता आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये दाखवली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने ग्राहक हा राजा होईल. आज राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने आपण सगळे निर्धार करूया की, आपण नुसतेच ग्राहक न होता सुजाण आणि जागरूक ग्राहक बनूया. जागो ग्राहक जागो,” असेही ते म्हणाले.