---Advertisement---
Jalgaon News: “रामायणानुसार, प्रभू श्रीराम हे आपल्या वनवासादरम्यान जिथं जिथं गेले त्या त्या भूमीला त्यांनी आपलं मानलं. प्रभू श्रीराम हे हिंदूची अस्मिता आणि प्रेरणास्थान आहे. हिंदू हा जगाच्या पाठिवर कोणत्याही देशात राहो, तो ज्या देशात राहतो तिथं बॉम्ब फोडणे ही हिंदूची संस्कृती नाही,” असे प्रतिपादन ‘रामायण’ अभ्यासक ॲड. श्रीराम ठोसर यांनी केले.
ते शहरातील ला.ना. विद्यालयाच्या भय्यासाहेब गंधे सभागृहात आयोजित संस्कृती, जळगाव संस्थेतर्फे आयोजित समारंभात ‘रामायण समजून घेताना…’ या कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमास ॲड. सुशील अत्रे, भालचंद्र पाटील, संजय हांडे, निरंजन चव्हाण, रणजीत चव्हाण, रमाकांत सोनवणे, राजेश नाईक, ॲड. आनंद मुजूमदार, ॲड. के.बी. वर्मा, ॲड. अविनाश पाटील, श्रीकांत खटोड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक ॲड. सुशील अत्रे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी संस्कृती, जळगाव ही संस्था स्थापन करण्या मागचा उद्देश स्पष्ट करताना हिंदू आणि भारताची संस्कृती काय आहे, यावर अधिकाधिक योग्य माहिती समाजापर्यंत पोहचवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले.
‘रामायण’ या विषयावर बोलताना ॲड. श्रीराम ठोसर पुढे म्हणाले, “रामायण हा हिंदू आणि संपूर्ण भारत वर्षाचा इतिहास आहे. वाल्मिकी रामायणाच्या माध्यमातून हा इतिहास मांडला गेला आहे.” अगदी सरळ भाषेत त्यांनी रामायणाचा उलगडा करत उपस्थितांना रामायण काळात काय घडलं ते सांगितलं. प्रभू श्रीरामांचा जन्म, 14 वर्षांचा वनवास, रावणाचा वध ते प्रभू श्रीराम यांचा राज्याभिषेक यावर त्यांनी विवेचन केले. हे सांगत असताना ते म्हणाले, “टी.व्ही.वर जे रामायण दाखवलं जातं ते वेगळं आहे आणि प्रत्यक्ष वाल्मिकी रामायण वेगळं आहे. राम वनवासात असताना त्यांनी ज्या ज्या भागात यात्रा केली ती भूमी आपली मानली. त्यामुळे ज्या देशात राहतो तिथंच बॉम्ब फोडणं ही हिंदूंची संस्कृती नाही. काही लोकं हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना धडा शिकवायचा असेल तर आपली संस्कृती जपली पाहिजे. प्रभू श्रीरामाचे विचार प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे,” असे आवाहनदेखील त्यांनी केले. कार्यक्रमास असंख्य जळगावकर उपस्थित होते. आभार प्रदर्शन श्रीकांत खटोड यांनी केले.