भुसावळ /धुळे : लहानपणापासून आपणास संकटांत असणाऱ्यांना मदत करण्याची शिकवण दिली जाते. परंतु, केव्हा केव्हा एखाद्याला मदत केल्याने आपणच अडचणीत येतो असाच अनुभव एका दुचाकीस्वाराला आला आहे. या दुचाकीस्वाराने एकाला दिलेली लिफ़्ट महागात पडली आहे. एक शेतकरी आपल्या मित्राची दुचाकी घेऊन धुळे येथे आला असता परतीच्या प्रवासात त्याच्यासोबत असे काही घडले की, कोणाला मदत करावी की नाही ? यावर विचार करण्यास भाग पडणारा प्रकार घडला आहे. नेमकं या दुचाकीस्वरासोबत काय घडलं जणू घ्या…
मित्राची दुचाकी घेऊन नवलाणेतील शेतकरी धुळ्यात आले व परतीच्या प्रवासात त्यांनी माणुसकी म्हणून एकाला वाहनावर बसवले मात्र नैसर्गिक विधीसाठी त्यांनी दुचाकी थांबवल्यानंतर भामट्याने दुचाकीला असलेली चावी पाहता काही क्षणात दुचाकी लांबवली. मोहाडी पोलिसांनी भामट्याला ४८ तासात हुडकून काढत त्यास बेड्या ठोकल्या. सचिन तुकाराम मिस्तरी (२९, रा. मोहाडी उपनगर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. आरोपीकडून चोरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.
असे आहे दुचाकी चोरी प्रकरण
नवलाणे, ता.धुळे येथील शांतीलाल दयाराम बागुल (४९) हे ९ ऑक्टोबर रोजी कामानिमित्त मित्र बाबुलाल पांडु कोळपे यांची ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच १८ सीबी ७१२९) घेवून धुळ्यात आले व काम आटोपताच दुचाकीने ते नवलाणेकडे निघाले. मात्र, चाळीसगाव चौफुलीजवळील पंपाजवळ अनोळखीने व्यक्तीने लिप्ट मागितल्याने बागुल यांनी माणुसकी धर्म जोपासला. परंतु, बागुल यांना नैसर्गिक विधी आल्यानंतर त्यांनी हॉटेल ५५५५५ च्या सर्व्हिस रोडलगत दुचाकी थांबवली. यावेळी दुचाकीलाच चावी राहित्याची संधी आरोपीने साधत दुचाकी लांबवली.
मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. यांनी आणला गुन्हा उघडकीस ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील व सहकाऱ्यांनी केली. तपास हवालदार प्रभाकर सोनवणे करीत आहेत.