---Advertisement---
मुंबई : कुटुंबातल्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्या धक्क्यातून सावरायला कुटुंबीयांना बराच काळ जातो. दुःख मोठं असलं तरी काही कामे त्याच कालावधीत करणे आवश्यक असतात. अशाच आवश्यक कामांमध्ये मृत व्यक्तीचे बँक खाते, लॉक राशी संबंधित कामांचा समावेश होतो.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदारांना मृत व्यक्तीच्या बँक खात्यातील पैसे आणि लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंसाठी दाव्यांचा निपटारा करताना किचकट प्रक्रियेला सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेकदा त्रास सहन करावा लागतो. पण रिझर्व्ह बँकेने या सर्व प्रक्रिया अत्यंत सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे सर्व बँकांमध्ये एकच समान पद्धत अवलंबण्यात येणार असल्याने मृत्यूपश्चात दावे प्रक्रिया अडथळामुक्त होण्यास मदत होणार आहे.
आजच्या डिजिटल काळात बँकेत काम करण्याची पद्धत बदलली असून बँकेशी संबंधित बहुतांश कामे ऑनलाइन झाली आहेत. पण प्रत्येक बँकेचे बँक खाते आणि लॉकर दाव्यांचा निपटारा यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया अवलंबल्या जातात. परिणामी नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर वारसांना पैसे किंवा वस्तू मिळणे खूप कठीण होते आणि त्यासाठी बराच वेळ लागतो. हे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
सध्याच्या सूचनांनुसार, बँकांना ‘नामांकित’ व्यक्ती/कायदेशीर वारसांनी केलेल्या दाव्यांचा त्वरित आणि त्रासमुक्त निपटारा करण्यासाठी एक सोपी प्रक्रिया अवलंबणे आवश्यक आहे. सध्या या प्रक्रिया वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे बँकांना सादर करायच्या प्रक्रिया सुलभकरण्याचा आणि कागदपत्रांचे प्रमाणीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात एक मसुदा परिपत्रक लवकरच सार्वजनिक सल्लामसलतीसाठी प्रसिद्ध केले जाईल, असे मल्होत्रा यांनी सांगितले.