चोपडा : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी जिल्यातील चोपडा विधानसभा मतदार संघातून आज शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे.
चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी मिळाली असून शिवसेना-उबाठाच्या वतीने पहिल्यांदा राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर झाली होती. तथापि, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे त्यांची उमेदवारी बदलून ऐन वेळेस भाजप नेते तथा माजी जि. प. सभापती प्रभाकरआप्पा सोनवणे यांना तिकिट मिळाले आहे. यावेळी अपक्ष उमेदवारी म्हणून माजी आमदार जगदीश वळवी आणि डॉ. चंद्रकांत बारेला यांनी अर्ज भरले होते.
दरम्यान, आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी डॉ. चंद्रकांत बारेला व जगदीशचंद्र वळवी यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आता मैदानात प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या विरोधात प्रभाकरआप्पा सोनवणे हे उरले आहेत. येथून अपक्ष तसेच अन्य लहान पक्षांचे उमेदवार रिंगणात असले तरी देखील प्रमुख लढत ही या दोन मान्यवरांमध्येच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.