तळोदा (मनोज माळी) : नगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात जय श्रीराम सोशल ग्रुपच्या सदस्यांनी मरिमाता परिसरातील गटारीत बसून आज, बुधवारी सकाळपासून आंदोलन सुरू केले आहे. शहरातील नागरी सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी या ग्रुपने मुख्य चौकात फलक लावला होता. मात्र, प्रशासनाने त्यावर आक्षेप घेत संबंधित सदस्यांवर गुन्हे दाखल केले.
नगरपालिकेच्या या कारवाईला अन्यायकारक ठरवत ग्रुपच्या सदस्यांनी आरोप केला आहे की, नागरी समस्यांवर आवाज उठवण्याच्या अधिकारांवर अंकुश लावण्याचा हा प्रकार आहे. जय श्रीराम सोशल ग्रुपने दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, “आम्ही केवळ जनतेच्या समस्या मांडल्या, परंतु प्रशासनाने दडपशाही करून आमच्यावर गुन्हे दाखल केले. शहराच्या विकासाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष होत असून, आम्ही शांततापूर्ण मार्गाने हा लढा सुरू ठेवू.”
शांततापूर्ण आंदोलनाची सुरुवात
आज सकाळपासून मरिमाता परिसरातील गटारीत बसून ग्रुपच्या सदस्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे, “तळोदा नगरपालिकेने पारदर्शक, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख प्रशासन द्यावे.” तसेच, प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयांविरोधात संविधानिक मार्गाने लढाई सुरूच राहील, असे ग्रुपचे उपाध्यक्ष अगन जोहरी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : सावधान! सायबर ठगांचा नवा फंडा, बँक बॅलेन्सवर असा घालतात गंडा
फलक प्रकरण आणि प्रशासनाची भूमिका
शहरातील नागरी सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी जय श्रीराम सोशल ग्रुपने आणखी ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता स्मारक चौकात एक फलक लावला होता. या विषयावर मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, ते नंदुरबार येथे बैठकीसाठी गेल्याचे समजले.
नागरिकांचा वाढता रोष
नगरपालिकेच्या या कारवाईमुळे तळोदा शहरातील नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. सोशल ग्रुपच्या आंदोलनाला लोकांचा पाठिंबा मिळत असून, पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा जय श्रीराम सोशल ग्रुपने दिला आहे.