Jalgaon : अन्‌‍ ‌जिल्हाधिकारी झाले ‌ ‘मनभावन’चे ‘आरजे’…

Jalgaon : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालयातील “रेडिओ मनभावन 90.8 एफएम“ या सामुदायिक रेडिओ केंद्राला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सदिच्छा भेट दिला. याप्रसंगी त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त रेडिओ केंद्राच्या स्टुडिओत चक्क आरजेचे सूत्र सांभाळत उपस्थित विद्यार्थिनींची अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मुलाखत घेतली.

जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वी आकाशवाणीत उद्घोषक, निवेदक म्हणूनही काम केल्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना या “रेडिओ मनभावन“च्या स्टुडिओतील कार्यक्रमात आरजे म्हणून सहभागी होण्याचा मोह आवरता आला नाही. विशेष म्हणजे त्यांनी आरजेच्या खास शैलीत विद्यार्थिनींशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनासह अनेक सामाजिक विषयांवर “मनभावन“ च्या सहकाऱ्यांनी बोलते केले आणि त्यांनीही अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. त्यांनी या केंद्रातील संपूर्ण कामकाजाची माहिती देखील समजून घेतली.

खान्देशातील संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा
या रेडिओ केंद्राच्या माध्यमातून शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थी, शिक्षक आणि समाजोपयोगी विविध उपक्रमांमुळे समाजातील अनेक घटकांना मनोरंजनासह ज्ञान, विज्ञान, माहिती, जनजागृती आदीबाबत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या लाभ मिळत आहे. पुढेही या केंद्राच्या माध्यमातून चांगले समाजोपयोगी विषय सकारात्मकरित्या जनतेपर्यंत पोहचावे. जळगावसह संपूर्ण खान्देशातील शैक्षणिक, साहित्य, धार्मिक, अध्यात्मिक माहिती, बोली, भाषा, खाद्यसंस्कृती, स्थानिक आदर्श रुढी, परंपरा, शासकीय योजना, विविध क्षेत्रातील विकास, प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे प्रसारण जास्तीत जास्त सकारात्मकरित्या व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हौशी बाल आरजेशी चर्चा
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आरजे म्हणून मूळजी जेठा महाविद्यालयातील एफ.वाय.बी.एसीच्या वर्गातील विद्यार्थिनी अश्विनी राठोड व सुजाता धुरंदर यांची मुलाखत घेतली. यात स्थानिक प्रशासन, विद्यार्थिनी, पालक, कौटुंबिक, महिलांच्या अनेक विषयांवरील चर्चा रंगली. प्राचार्य एस.एन.भारंबे यांनी खान्देश कॉलेज एज्युकेशन संस्थेसह मू.जे.महाविद्यालयाची माहिती सांगितली. रेडिओ मनभावन 90.8 एफएम केंद्राच्या कामकाजाची माहिती केंद्र संचालक अमोल देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

याप्रसंगी ओरीयन सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूलमधील पाचवीच्या वर्गातील हौशी बालआरजे विभूती देशमुख हिनेही जिल्हाधिकाऱ्यांनाशी संवाद साधताना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना जिल्हाधिकाऱ्यांनी तितक्याच गंमतीने उत्तरे दिली. या वेळी विद्यार्थिनी गायत्री पाटील, वैष्णवी पाटील (एफ.वाय.बी. एसी),प्रियांका बारी (एफ. वाय बी एसी )ट्रान्समिशन ऑपरेटर राहुल पाटील, साहिल गायकवाड, पीआरओ ज्ञानेश्वर वाघ उपस्थित होते.