डॉ. पंकज पाटील
Jalgaon : एकल युज वापराच्या प्लॉस्टिक पिशव्या आणि थर्माकोलमुळे पर्यावरणासह सजीवांना मोठी हानी पोहचत आहे. सिंगल युज प्लॉस्टिकची पिशवी न वापरण्याबाबत जनजागृती करूनही त्याचा उपयोग होतांना दिसत नाही. यावर पर्याय म्हणून आता ईपीआर प्लॉस्टिकचा काढण्यात आला आहे. ही पिशवी घेणाऱ्या ग्राहकास एक किलो पिशव्या विकल्यानंतर त्यास प्रति किलो मागे 15 रूपये मिळू शकतात.
सध्या सिंगल युज प्लॉस्टिक व थर्माकोलच्या उत्पादनासह वापरावर शासनाने बंदी घातली आहे. प्लॉस्टिकच्या वापराचा त्रास आता जागतीक स्तरावर होत असून पर्यावरणाला त्याचा मोठा धोका पोहचत आहे. नदीनाल्यात तर याचा मोठा थर साचलेला दिसून येत आहे. असे असतानाही आर्थिक लाभासाठी अनेक उत्पादक या बंदी घातलेल्या प्लॉस्टिकच्या पिशव्याचे उत्पादन करून ते चोरूनलपून विक्री करत आहेत. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका, नगरपालिका कारवाई करत आहेत. असे असले तरी ही कारवाई तेवढ्यापुरताच मर्यादीत असते.
कारवाई करूनही सिंगल युजचा होतोय वापर
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गेल्या चार दिवस शहरात विविध भागात सिंगल युज प्लॉस्टिकवर कारवाई केली गेली. यापुर्वीही तत्कालीन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी थेट कारखान्यात जात कारवाई केली होती. तरीही चोरून लपून हे कारखानदार या पिशव्याचे उत्पादन करत आहेत.
ईपीआर प्लॉस्टिकची पिशवी घ्या
ईपीआर प्लॉस्टिकची पिशवी ही रिसायकल होत असते. या पिशवीवर उत्पादकाचे नाव, पत्ता, फोन क्रमांक, किती मायक्रॉनची आहे आदी माहिती छापलेली असते. जळगावात ईपीआर पिशवी बनविणारे 7 ते 8 कारखाने आहेत. ईपीआर म्हणजे एक्सटेन्डेड प्रोड्युसर रिस्पॉनबिलीटी.अर्थात ज्या कंपनीने ही पिशवी उत्पादीत केली आहे त्याच कंपनीची रिसायकल करण्याची ती जबाबदारी असते.
असे मिळवाल 15 रूपये
ईपीआर प्लॉस्टिकच्या पिशवीवर उत्पादकाचे नाव, पत्ता, फोन क्रमांक दिलेला असतो. अशा पिशव्या ग्राहकाने वस्तू घेताना दुकानदारास मागाव्यात. अशा पिशव्या घरी सांभाळून ठेवाव्यात. साधारणत: एक किलो पिशव्या जमा झाल्यास त्या उत्पादक कंपनीस परत केल्यास एका किलोमागे 15 रूपये परत करेल. हा उत्पादक ही पिशवी परत रिसायकल करून त्यापासून पुन्हा नविन ईपीआर पिशवी तयार करेल. यामुळे रस्त्यावर, गटारीत, मोकळ्या जागेत प्लॉस्टिक पिशवी येणार नाही. यामुळे पर्यावरणास हानी पोहचणार नाही.
सिगल युज प्लॉस्टिकला नाही म्हणा, ईपीआरला हो म्हणा…
सिंगल युज प्लॉस्टिकवर कारवाई होत असली तरी देहु,दमण, दादरा हवेली येथून व स्थानीक उत्पादकांकडून या पिशव्यांचे उत्पादन केले जाते. याबाबत कारवाई सुरूच असते. आता नागरिकांनीच लक्ष्ा देण्याची गरज आहे. बाजारात गेल्यानंतर दुकानदारांना ईपीआर प्लास्टिक पिशवी मागावी. ज्यावर उत्पादकाचे नाव, संपर्क क्रमांक दिलेला असतो. या पिशव्या जमा करून त्याच कंपनीला विकाव्यात. साधारणपणे एका किलोमागे ते 15 रूपये देत असतात.
– किरण सिंग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव