Jalgaon : एकावर आठ गुन्हे दाखल होते, दुसऱ्यावर सहा, अखेर पोलिसांनी शोधून काढले

जळगाव : शांतता भंग करणार्यावर पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली असून, दोन जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रकाश चंद्रकांत कंजर (34, खंडेराव नगर जळगाव) व सोनू रामेश्वर पांडे (28, मामाजी टाकी मागे, भुसावळ) अशी स्थानबद्ध झालेल्यांची नावे आहे. त्यांची अनुक्रमे ठाणे व येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

जळगावच्या खंडेराव नगरातील प्रकाश कंजर हा अवैधरीत्या हातभट्टीची दारू तयार करून त्याची विक्री करीत असल्याने त्याच्यावर आतापर्यंत एकूण आठ गुन्हे दाखल आहेत तर भुसावळातील सोनू पांडे याच्यावर घरफोडी, जबरी चोरी, शिविगाळ करून धमकी देणे असे सहा गुन्हे दाखल होते. या दोघांच्या एमपीडीएच्या कारवाईचा प्रस्ताव भुसावळ व जळगाव पोलीस प्रशासनाने तयार केल्यानंतर तो पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे सादर करण्यात आला. यंत्रणेने प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर दोन्ही प्रस्ताव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सादर केल्यानंतर दोघांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचे आदेश पारीत करण्यात आले.

एमपीडीए कायद्यांतर्गत नोव्हेंबर 2022 पासून आजपावेतो गंभीर गुन्हे दाखल असलेले एकूण 21 गुन्हेगारांवर धोकादायक व्यक्ती, हातभट्टीवाले व वाळू तस्कर या नियमाखाली नागपूर, अमरावती, ठाणे, नाशिक, येरवडा या मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा गुन्हेगारांनी चांगलाच धसका घेतला आहे.