Jalgaon : खड्डे पडलेल्या नव्या रस्त्यांची जबाबदारी महापालिका की पीडब्ल्युडीची?

Jalgaon :  गेल्या 25 वर्षांनंतर जळगाव महापालिकेच्या विविध रस्त्यांच्या नूतनीकरणाची कामे महापालिका व पीडब्ल्युडीच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. रस्त्यांच्या कामांबाबत महापालिका व  पीडब्ल्युडी यांच्यात योग्य समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे रस्ते तयार होत असले तरी दुसरा रस्ता तयार होत नाही तोच पहिल्या रस्त्यावर खड्डे पडत आहेत. नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर पडलेले खड्डे दुरूस्तीची जबाबदारी महापालिकेसह पीडब्ल्युडी विभागाने झटकली आहे. त्यामुळे नवीन रस्ते होऊन खड्ड्यांचा त्रास जळगाकरांच्या नशिबात येत असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत आता लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष्ा देण्याची मागणी त्रस्त वाहनचालकांकडून होत आहे.

 

नवीन रस्त्यावर पाच  जीवघेणे खड्डे

 

रिंगरोड चौक ते कोर्ट चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पीडब्ल्युडीने केलेले आहे. डांबरीकरणानंतर काही महिन्यातच ट्रॅफिक गार्डनसमोरील कृष्णा हॉस्पिटलसमोरील रस्ता पूर्णपणे उखडला गेला आहे. त्यामुळे येथे वाहन चालवताना वाहनचालकांची कसरत होत असते.

रिंगरोडकडून कोर्ट चौकात येताना रस्त्यावर पाच मोठे खड्डे लागतात. चढती असल्याने वाहनचालक वेगाने येत असताना अचानकपणे हे खड्डे समोर दिसतात. वाहनचालक हा खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करतो. यामुळे मागून येणाऱ्या वाहनचालकाचाही गोंधळ उडतो. जर खड्डा चुकवणे जमले नाही तर वाहन खड्ड्यात जोरात आदळते आणि अपघाताला निमंत्रण मिळते.

 

दोघांच्या वादात रस्ते होताय खड्डेमय

शहरात नवीन रस्ते तयार होत असले तरी महापालिका व पीडब्ल्युडी यांच्या वादात या नवीन रस्त्यांना खड्डे पडत आहेत. त्यामुळे नवीन रस्ते होऊनही करदात्यांच्या नशिबी रस्त्यातील खड्डेच आहेत असे चित्र दिसत आहे. नवीन रस्त्यांतील खड्डे दुरूस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची हे आता थेट मुख्यमंत्र्यांनीच सांगावे, अशी अपेक्ष्ाा आता जळगावकर करत आहेत.

 

आयुक्तासंह पीडब्ल्युडीच्या

 अभियंत्यांवर कारवाईची मागणी

लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासनाने जळगाव शहरातील केवळ रस्त्यांसाठी कोट्यवधी रूपये दिलेले आहेत. मात्र त्यांचे कोणत्याही पध्दतीने नियोजन न करता रस्त्यांची कामे केली जात आहेत. अनेक रस्त्यांची कामे डबल करण्यात येत आहेत. नवीन रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरूस्तीबाबत दोन्ही विभागांनी हात वर केले आहेत. त्यामुळे एवढा मोठा खर्च होऊनही जर नवीन रस्ते खड्डेमयच होणार असतील तर  जनतेच्या कर रुपातून जमा झालेल्या पैशांचा अपव्यय आहे.

 

याचा विपरीत परिणाम आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यताही नागरिक बोलून दाखवत आहेत. महापालिका आयुक्त व पीडब्ल्युडीचे मुख्य अधीक्ष्ाक यांच्यासारख्या उच्च पदस्थांमध्ये योग्य समन्वय जर साधला जात नसेल तर या दोघांची बदली करावी अशीही मागणी आता होत आहे. या दोन्ही विभागांनी योग्य समन्वय साधण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी एक स्वतंत्र बैठक घेऊन केले होते. या आवाहनालाही या दोघांनीही केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष्ा देणे गरजेचे आहे.

 

मग दुरुस्तीची जबाबदारी कोणाची?

हा रस्ता महापालिकेने केलेला नसल्याने त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी मनपाची नसल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगतात. याबाबत पीडब्ल्युडीच्या अभियंत्यांना आम्ही सांगू शकत नाही. कारण त्यांचे पद आमच्या पदापेक्ष्ाा मोठे असल्याचे कारण ते सांगत असतात. तर पीडब्ल्युडीच्या अभियंत्यांकडे चौकशी केला असता आम्ही रस्ता तयार करून दिला आहे. पुढील जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगतात.