जळगाव : जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कधी खड्ड्यांमुळे तर कधी भरधाव वाहनामुळे झालेल्या अपघातात कित्येक जणांचे आयुष्य आणि संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेकांची स्वप्ने बेचिराख झालेली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाचे असो, जिल्हा पोलीस अधीक्ष्ाकांचे असो, जळगाव महानगरपालिकेचे असो, प्रादेशिक परिवहन विभागाचे असो, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे असो त्यांच्या लेखी अपघात हा अपघात आहे. यात कितीही जीव गेले तरी यांना त्यांचे कोणतेही सोयरेसुतक नाही उलट त्यांना या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या ‘हप्त्यांत’… होय… दुर्दैवाने ‘हप्तेच’ म्हणावे लागेल. अधिकची वाढ होते. त्यामुळेच ते अपघात ही एक घटना आहे किंवा त्यांचे नशिब म्हणून त्याकडे पाहत आहेत.
कारण कसायाला ‘गुरे कापताना’ जसा आनंद मिळतो तसा ‘आनंद’ यांना मिळत असावा, असे खेदाने म्हणावेसे वाटते. वरील सर्व प्रशासनाच्या उच्च पदावर बसताना गरिबांची सेवा, शहराचा, जिल्ह्याचा विकास, शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा तळागाळापर्यंत लाभ मिळवून देण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे स्वत:चे करीअर करणे, यासारख्या विविध कारणांसाठी शासकीय सेवेत येत असतात. या सर्वांना या पदापर्यंत कसे पोहचलात असे विचारले असता अनेकजण जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकेच्या शाळात शिकले, घरची परिस्थिती हालाखीची, गरिबीची, खूप कष्ट कले, जीव तोडून अभ्यास करून शासकीय स्पर्धा परीक्ष्ाा पास होत या उच्च पदावर पोहचले असल्याचे सांगत असतात. त्यांचा हा इतिहास ऐकून खरोखच भारावल्यासारखे होते.
आपणही असे प्रामाणिकपणे, कष्ट करून जिद्दीने या पदापर्यंत पोहचू आणि आपल्यासह आपल्या गावाच्या, शहराच्या, जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करू, अशी प्रेरणा यातून मिळते. शासकीय अधिकारी लाच घेतात, टेबलाखालून घेतात, भ्रष्टाचार करतात हे मी स्वत: करणार नाही वगैरे वगैरे यासारखे आदर्शाचे पाठ मनात ठेवून भलेही शासकीय पदांवर बसत असतील. परंतु कालांतराने तेही याच ‘माळेचे मणी’ होत असल्याचे चित्र सध्या तरी जळगाव शहरातील विकास कामे आणि महामार्गावरील होणाऱ्या अपघातांवरून दिसून येत आहे.
शहरातील राष्ट्रीय महामार्गावर अपघातात जीव गेला की अनेक आंदोलने, मोर्चे येतात. वरील सर्व प्रशासनाला विविध इशारे दिले जातात. प्रशासनही निवेदेने घेते आणि चार दिवसात ते निवेदन कचऱ्यात टाकले जाते आणि पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या…’ या बाबी नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या भूमिकेतून वरील सर्व प्रशासकीय यंत्रणा वागत आहेत. स्वत:चे करीअर यशोशिखरावर कसे नेता येईल आणि जास्तीत जास्त लक्झरी जीवन कसे जगता येईल याचा या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी आणि ही विकास कामे करणारे मक्तेदार मंडळी करत आहेत, असाही आरोप वेळोवेळी निघणाऱ्या या मोर्चेकऱ्याकडून होत असतो. दुर्घटना घडली की मोर्चे काढले जातात, प्रशासन निवेदने स्वीकारते आणि पुढे सर्व काही ऑलबेल होते.
काही महिन्यांपूर्वी औद्योगिक वसासहतीत दोन केमिकल कंपन्यांमध्ये स्फोट झालेत. कितीतरी कामगार जखमी, मृत व कायमचे अपंग झाले. घटना घडताच वरील सर्व यंत्रणा व त्यांच्या प्रमुखांनी चमकोगिरी करत आम्ही किती ‘तत्पर’ आहोत हे दाखवून दिले. माध्यमातून विशेषत: अनधिकृत यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्यांची ही चमकोगिरीची ‘तत्पर’ता सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचवली गेली. रिकाम्या अग्निशमन बंबावर उभे राहत फोटो आणि व्हिडीओग्राफी करणारेही जिल्हा ‘अधिकारी’ जळगावकरांनी पाहिले आहेत. मात्र जसे दिवसांमागून दिवस गेले तसे या सुरक्ष्ाा यंत्रणाही ‘हप्त्यांत’ सुखावतात.
महामार्गावर झालेल्या अपघातात जीव गेले की मोर्चे निघतात, जाणाऱ्या निष्पाप जीवांबद्दल ‘माणुसकी’ जिवंत असल्याचे चित्र दिसत असते. मोर्चेकरी जीवाच्या आकांताने ‘हप्त्यांत’ झोपलेल्या प्रशासनाला जागे करतात. मात्र प्रशासन शांतच असते.
28 ऑगस्ट रोजी मानराज पार्कजवळ झालेल्या अपघातात दोन जीव गेले. घटनेच्या दोन दिवसानंतर माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी खोटेनगर ते आकाशवाणी चौक असा जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात त्यांनी या सहा कि.मी.च्या महामार्गावरील खड्ड्यांची संख्या मोजली. ती 200 च्या पुढे गेली. अपघातानांतर वरील सर्व प्रशासकीय यंत्रणा ‘मुर्दाड’ नसती तर माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी काढलेल्या या मोर्चात त्यांना राष्ट्रीय महामार्गावर एकही खड्ड्ा मोजण्यासाठी सापडला नसता.
राष्ट्रीय महामार्गाच्या हप्त्यात सुखावलेल्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने महामार्गाची जातीने पाहणी करून रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करून खड्डे मुक्त महामार्ग केला असता. पण… मागे खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘सेल्फी विथ खड्ड्ा’ असा उपक्रम राज्यभर राबविला. त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनीही असे ‘सेल्फी विथ खड्ड्या’चे फोटो काढून माध्यमातून प्रसिध्द करत जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांना पाठविलेत. जळगावातही असा उपक्रम राबविला गेला. पण पुढे काय झाले. तेव्हा याच ‘मुर्दाड’ प्रशासनाने त्याच चमकोगिरी म्हणत सोडून दिले. त्याचा परिणाम जळगावकर रोज भोगत आहेत. आज कोणाचा ना कोणाच्या घरात अपघाताचे सावट आहे.
महापालिकेची स्थिती वेगळी नाही
जळगाव शहराच्या गल्ली बोळातील रस्ते डांबरी करण्यासाठी लोकप्रतिनिधीनी कोट्यावधी रूपये आणले. तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्र्यांनीही 100-100 कोटी रुपये दिले. पण स्थिती काय आहे? रोज महापालिकेत नागरीक रस्ते आणि गटारीच्या समस्या घेवून येत आहेत. आयुक्त निवेदन घेतात. बातमी प्रसिध्द होते. सायंकाळी निवेदन कचरा कुंडीत. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त हे मूळ जळगावचे रहिवासी नाहीत. त्यामुळे त्यांना जळगावकरांबद्दल आस्था असण्याचे कारणच नाही.
शहराचा ‘विकास’ होवो वा ‘भकास’ याच्याशी त्यांना काहीही घेणेदेणे नसते. फक्त आपला शासकीय पगार, आपले करीअर, त्या पदाच्या मिळणाऱ्या शासकीय सुविधा आणि मक्तेदारांकडची मिठाई यांच्याशी त्यांना घेणेदेणे असते. त्यासाठीच ते जीव तोडून ‘मेहनत’ मात्र प्रामाणिकपणे करतात. मात्र जे शहराचे, जिल्ह्याचे मूळ रहिवासी आहेत अशा अधिकाऱ्यांनी तरी याकडे ‘प्रामाणिकपणे’ लक्ष्ा देणे गरजेचे आहे. कारण हे शहर तुमचे आहे याचा विसर तरी कसा पडतो. आज अनेक अधिकारी जळगाव शहर सोडून मुंबई पुण्यात स्थायिक होत आहेत. हेही लक्ष्ाात घ्यावे लागेल.
शहराच्या सुविधांसाठीही मोर्चे काढा
माजी महापौर, उपमहापौर यांनी महार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी मोर्चे काढले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदने देत इशारे दिलेत. कारण सामाजिक दिसत असले तरी त्यात राजकारण आहेच कारण विधानसभा येत आहेत. नंतर महापालिकेच्या निवडणुका आहेत. हे लिहिण्याचे कारण असे की जळगाव शहरातील रस्त्यात खड्डे नाही तर खड्ड्यांनी चाळण झाली आहे. चांगले रस्ते, पक्क्या गटारी, सफाई आणि पथदिवे व योग्य दाबाने पाणीपुरवठा यासाठी जळगावकर महापालिकेला कर देत असतात. त्याचा याच कामांसाठी योग्य व प्रामाणिकपणे उपयोग व्हावा एवढीच माफक अपेक्ष्ाा जळगाकर ‘कर’ दात्यांची आहे. नाही म्हणायला महासभा, स्थायी सभेतील इतिवृत्तांतून शहराच्या विकासाची गंगा वाहत असली तरी प्रत्यक्ष्ा जमीनीवर अजुन उतरलेली नाही. ती उतरावी यासाठीही मोर्चे, धरणे आंदोलने करून शासनाच्या या ‘प्रशासन’ नामक टक्केवारीत व हप्त्यांत पोसलेल्या या ‘पांढऱ्या हत्ती’ला जागे केले पाहिजे. त्याला हादरून सोडले पाहिजे. तरच हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ‘मुर्दाड’ या व्याख्येतून बाहेर पडतील. मात्र तशी स्थिती नाही. त्यामुळेच आता जळगाकरांनो या ‘मुर्दाड’ प्रशासनाकडून फार अपेक्ष्ाा न ठेवता आपली सुरक्ष्ाा आपणच बाळगावी.
= डॉ. पंकज पाटील
संपर्क – 7588822126