Jalgaon : महाराष्ट्र तसेच खान्देश संस्कृतीचा सुरेख संगम असलेल्या पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे 28 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हा प्रशासनातर्फे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस कवायत मैदानावर होणाऱ्या या महामहोत्सवात स्थानीक कलावंतासह लोक कलावतांना संधी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. ते अल्पबचत भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पोलीस कवायत मैदानावर होणाऱ्या या महोत्सवात सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा घेण्यात येतील. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामाराची स्थापना, प्रतिकृती व इतरबाबत प्रदर्शन दालन पाचही दिवशी खुले राहणार आहे.
महामहोत्सवाच्या पहिल्या दिवशी 28 रोजी महाराष्ट्राची हास्ययात्राचे आयोजन करण्यात आहे. 29 रोजी निर्माता दिग्दर्शक गायक संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी, कवी गीतकार व गायक संदीप खरे यांचा आयुष्यावर बोलू काही हा संगीतमय कार्यक्रम होईल. 1 मार्च ला ‘सुर नवा ध्यास नवा’ ची महाविजेती सन्मिता धापटे शिंदे व ‘सारेगमा’ फेम चैतन्य कुलकर्णी हे ‘सुरसंस्कृती’ हा कार्यक्रम सादर करतील. 2 मार्चला महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा स्वरनिनाद कल्चरल फाऊंडेशनतर्फे ‘गर्जा सुवर्ण महाराष्ट्र’ सादर होईल.
3 मार्चला साहित्य संघ, मुंबई निर्मित व उपेंद्र दाते दिग्दर्शित नाटक ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ सादर होईल. या महामहोत्सवाच्या 28 फेब्रुवारी रोजी स्थानिक कलाकार बुरगुंडा, जिजाऊंच्या लेकी, शिवकालीन लोक कला सादर करतील. 29 फेब्रुवारी रोजी पारंपरिक लोक कला, नृत्य. शिवकालीन मर्दानी खेळ, लोकनाट्य किंगरी- स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची गाथा सादर होतील.1 मार्च रोजी दिवशी गण गवळण, बतावणी, शाहिरी छत्रपती शिवाजी महाराज, गोंधळ लोकगीते, वही गायनाचा कार्यक्रम होईल.
2 मार्चला पद्मपाणी मीडिया, परिवर्तन बहिणाबाईंच्या कविता, गीत गायन सादर करतील. तर 3 मार्चला डॉ. अपर्णा भट आणि इतर कलावंत संगीत, नाट्य, नृत्य अवधेय सादर करतील.
या महामहोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी पारंपरिक नृत्य स्पर्धा व शिवकालीन इतिहास निबंध स्पर्धा घेण्यात येईल. दुसऱ्या दिवशी 29 फेब्रुवारी रोजी पारंपरिक वेशभूषा व जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयांवर वकृत्त्व स्पर्धा घेण्यात येईल. 1 मार्च रोजी चित्रकला स्पर्धा तर 3 मार्च रोजी महासंस्कृती मॅरेथॉन व स्केटींग रॅली काढण्यात येईल.