Jalgaon : त्र्यंबकनगरातील या अर्धवट रस्त्यांचे करायचे काय?

Jalgaon :   येथील महाबळ कॉलनीपुढे असलेल्या त्र्यंबकनगर ते संत गाडगेबाबा चौक या परिसरातील उजव्या बाजुकडील रस्त्यांचे काम अर्धवटरित्या करण्यात आले आहे. त्यामुळे हे रस्ते पूर्ण होतील की नाही याबाबत नागरिकांमधून प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, संत गाडगेबाबा चौकात ‌‘अमृत’च्या जलवाहिनीला लागलेली गळती दुरूस्त करण्यात आली असली तरी त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांची दुरूस्ती करण्यात आलेली नाही.

 

शहरात गेल्या 25 वर्षानंतर रस्त्यांच्या कामांना सुरवात झाली आहे. यातील काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभाग, तर काही रस्ते हे महापालिका तयार करत आहेत. यात महाबळ चौकापासून तर त्र्यंबक नगरच्या शाळेपर्यंतच्या रस्त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असला तरी त्यावर कारपेटचा व डांबराचा थर न दिल्याने या रस्त्यावर आता खड्डे पडत आहे. त्र्यंबकनगर शाळा ते संत गाडगेबाबा चौकापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी खडीकरण करून डांबराचा एक थर देण्यात आला. यातही गाडगेबाबा चौकापासून महाबळकडे येणाऱ्या रस्त्याचे अधर्वटरित्या डांबरीकरण करण्यात आले आहे. आदित्य प्लाझा व त्र्यंबकनगर या भागात हे रस्ते अर्धवट तयार करण्यात आले आहेत.

 

अर्धवट रस्ते कधी होतील पूर्ण

अर्धवट डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे काम पूर्ण कधी करण्यात येणार आहे, असा प्रश्न येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

दुरूस्तीनंतर खड्डा ‌‘जैसे थे’

डांबरी रस्ता खोदून जलवाहिनीची दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळे जलवाहिनीतून होणारी पाण्याची गळती थांबली असली तरी त्यासाठी खोदलेल्या खड्ड्याची दुरूस्ती करून त्याचे त्वरित डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे आता हा खड्डा वाहतुकीसाठी धोक्याचा ठरत आहे.

 

बदल्या झाल्यात; पण कामाचे काय?

मनपाच्या कामकाजात गतिमानता यावी म्हणून आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी बांधकाम विभागासह नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात. परंतु तरीही कामकाजात गतिमानता आलेली दिसत नाही. गाडगेबाबा चौकात जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी करण्यात आलेल्या खड्ड्याचे डांबरीकरण व अर्धवट रस्त्याचे डांबरीकरण कधी होईल याबाबत सध्या तरी काहीच सांगता येत नसल्याचे चित्र आहे.

 

 

 

तरुण भारत’च्या वृत्ताची दखल

संत गाडगेबाबा चौकात रस्त्याच्या मध्यभागी ‌‘अमृत’च्या जलवाहिनीला गळती लागली होती. नव्याने केलेल्या डांबरी रस्त्याखालून पाणी झिरपून वाहत ते सरळ गटारीत जात होते. याबाबत ‌‘तरुण भारत’ने 30 जानेवारीच्या अंकात ‌‘अरेच्च्या… गाडगेबाबा चौकात डांबरी रस्त्यांना फुटला पाझर’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिध्द केले होते. यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या महाबळ युनीटने त्याची दखल घेत रस्ता खोदून जलवाहिनीची गळती दुरूस्त केली.

 

 

वाहतुकीची अडचण

रस्त्याचे अर्धवटरित्या डांबरीकरण केल्यामुळे वाहतुकीची अडचण होत आहे. रस्त्याची एक बाजू चांगली तर शेजारील बाजू खराब असल्याने वाहनचालक मागून येणाऱ्या वाहनास साईड देण्यास सहजासहजी तयार होत नाही.