जळगाव | यंदाच्या हंगामातील तूर आणि हरभऱ्याच्या चांगला भाव मिळत असल्याचे दिसत आहे. जळगाव बाजार समितीमध्ये तुरीला दोन वर्षानंतर उच्चांकी भाव मिळत आहे. तुरीचा भाव तब्बल १० हजार १७५ रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. तर या हंगामातील गुलाबी हरभऱ्याला तब्बल ८ हजार ४० रुपये क्विंटल इतका भाव मिळत आहे. भावात तेजी आल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत.
गेल्या वर्षी तुरीला हमीभावापेक्षा जास्त म्हणजे ८ हजार रुपये भाव मिळाला होता; मात्र, यंदा भावाने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी जळगाव बाजार समितीमध्ये तुरीचे दर १० हजार १७५ रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले. विशेष हमीभावापेक्षा तुरीला जास्तीचा भाव मिळत आहे. तुरीला ७ हजार रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे.
बाजार समितीमध्ये तुरीची खरेदी गेल्या दोन महिन्यांपासून केली जात आहे. मात्र, पहिल्यांदाच तुरीचे दर १० हजार रुपयांच्या पार गेले आहेत. गेल्या तीन महिन्यांत तुरीच्या दरात २५०० रुपयांची वाढ झाली आहे. तुरीच्या बाजार भावातील हीच तेजी कायम राहिल्यास काही दिवसांत हे भाव ११ हजारांचा टप्पा गाठतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दुसरीकडे हरभऱ्याला देखील चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदित आहे. बाजार समितीमध्ये हरभऱ्याची खरेदी सुरु असून, दरात १०० रुपयांची वाढ झाली आहे. गुलाबी हरभऱ्याचे दर ८ हजार ४० रुपयावर गेला आहे. तर चाफा हरभऱ्याचे दर ५,९२५ रुपये इतका दर मिळत आहे.