Jalgaon : पाच वर्षांत तब्बल १९ सोनसाखळी केल्या चोरी, तरी लागत नव्हते हाती, अखेर आवळल्या मुसक्या

Crime News : राज्यासह जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले आहे. मात्र, जळगावात सोनसाखळी लंपास करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागत नव्हती. अखेर या सोनसाखळी चोरट्यांच्या रामानंदनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय अमृत बागुल (३९, रा.मोहननगर, मुळ रा.मोहाडी, जि.धुळे) व सुधारक उर्फ जितेंद्र सुरेश महाजन (२५, रा. रामेश्वर कॉलनी) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून त्यांनी १९ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रामानंदनगर, जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सोनसाखळी धूमस्टाईलने खेचून नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत्या. काही दिवसांपूर्वी नुतन वर्षा कॉलनीमध्ये ७० वर्षीय वृध्द महिलेची सोनसाखळी लांबवून पळणा-या दत्तात्रय बागूल याला रामानंदनगर पोलिसांनी पकडले होते. नंतर त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने १९ सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तर गुन्ह्यांमध्ये त्याचा साथीदार सुधाकर महाजन हा सुध्दा असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ महाजन याला सुध्दा रामेश्वर कॉलनीमधून अटक केली.

दत्तात्रय आणि सुधाकर हे शहरातील एका कंपनीमध्ये मजुर म्हणून कामाला होते. पण, मौजमजेसाठी त्यांनी चोरीचा मार्ग निवडला. सन २०१८ ते २०२३ मे पर्यंत त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ तर जिल्हापेठच्या हद्दीत ०२ आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ०२ असे एकूण १९ सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले आहेत. त्यापैकी १४ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे.

दरम्यान, रामानंदनगर पोलिसांनी दोघांकडून २६ तोळे सोने जप्त केले आहे. त्यामध्ये सोनसाखळ्यांचा समावेश आहे. तसेच गुन्ह्यांमध्ये वापरलेली दुचाकी सुध्दा रामानंदनगर पोलिसांनी जप्त केली आहे. दोघांची कसून चौकशी केली जात असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांना पुढे जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिस चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत.