Jalgaon : संगीता पाटील यांना महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्कार प्रदान

 Jalgaon : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स महिला उद्योजकता समितीच्या अध्यक्ष तथा आयएनआयएफडी इन्स्टिटयूटच्या संचालिका संगीता पाटील यांच्या कार्याची दखल घेत महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते पुणे येथे त्यांना ‘महाराष्ट्र कन्यारत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

एमआयटी एटीडी विद्यापीठ संचालित स्कूल ऑफ लॉ व बृहन महाराष्ट्र अकादमी यांच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागाच्या सहकार्याने ‘एम्पॉवरमेंट समिट २०२४’ व ‘महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्यासह एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, एमआयटी स्कुल ऑफ लॉ च्या अधिष्ठाता डॉ. सपना देव, बृहन महाराष्ट्र अकादमीचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, एम. तिरुमल आदी याप्रसंगी उपस्थित होते.

 

राज्यात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना ‘महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.  संगीता पाटील यांनी आजतगायत राज्यातील महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.

 

यामध्ये महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून उदयमी महिलांना औद्योगिक क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणणे. तसेच नवद्योजक महिलांना शासनाची माहिती उपलब्ध करून देऊन त्यांना मार्गदर्शन कार्यक्रम, महिला सशक्तीकरणासाठी तरुणी व महिलांसाठी करियर संधी या विषयावर विविध मार्गदर्शन कार्यक्रम, आयएनआयएफडी इन्स्टिटयूट व संगीता अकॅडमीच्या माध्यमातून गेल्या 21 वर्षात अनेक तरुण तरुणीना विविध प्रकारे शिक्षण, प्रशिक्षण देऊन त्यांना स्व-बळावर उभे केले आहे. तसेच रोटरीच्या अध्यक्षीय काळात विविध सामाजिक उपक्रमांसह गरजू नवजात बाळांसाठी माता अमृत मदर मिल्क बँकेची स्थापना केली आहे.

 

त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘महाराष्ट्र कन्यारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  या पुरस्कार सोहळ्यात संगीता पाटील यांच्यासह केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संचालक झेलम चौबळ, ‘सिफा सिंगापूर’च्या अध्यक्षा  डॉ. शिल्पा स्वार, झेप फाऊंडेशन मुंबईच्या डॉ. रेखा चौधरी, उद्योजिका राजश्री गायकवाड यांचा समावेश होता.

 

‘पुरस्कार हे प्रेरणा देतात, प्रेरणेतून राष्ट्रनिर्मिती होते’… मिळालेला पुरस्कार हा आणखी जबाबदारी देणारा आहे. एवढ्यावरच नं थांबता अधिक महिलांना उद्योग क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित करु, कुटुंबाची साथ आणि सहकारींच्या सहकार्याने आयुष्यातील प्रवास करणे संभव झाले त्यामुळे हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करते.

संगीता पाटील