जळगाव : ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोषात घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातढोलताशांच्या गजरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. श्री गणेशाच्या आगमनाने शहरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे
श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध सार्वजनिक मंडळात देखावे निर्माण केले जात आहेत. यावर अंतिम हात फिरविला जात आहे. तसेच घरोघरी गणपतींच्या आगमनाची तयारी केली जात आहे. सकाळपासून ढोलताशांच्या निनादात शहरातील आणि शहराच्या बाहेर गणपतींची मूर्ती नेली जात असल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे.
बाप्पांच्या आगमनाची तयारी पार्श्वभूमीवर विविध भागात मूर्तीची विक्री करणारे शेकडो स्टॉल शहरात लागले आहेत. पूजेच्या तयारीसाठी लागणारे साहित्य, तसेच मूर्ती खरेदीसाठी सर्व बाजारपेठेमध्ये गर्दी दिसून आली. पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, कमळ, दुर्वा, तुळशी, पत्री यांना आज चांगली मागणी होती. सार्वजनिक गणेश मंडळात देखावे तयार केले जात असून त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे. टॉवर चौक, आकशवाणी चौक, कालिंका माता चौक, गणेश कॉलनी चौक, पिंप्राळा तसेच शहरातील विविध कॉलनी परिसरात श्री गणेशाची मूर्ती विक्रीसाठी दुकाने थाटली असून त्या ठिकाणी लोकांची गर्दी दिसून येत आहे.
गणपतीसाठी लागणाऱ्या वस्तू, साहित्यांची दुकाने ठिकठिकाणी लागली आहेत. गणरायाच्या स्वागतासह सजावटीसाठी आकर्षक साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहे. या साहित्यासह श्री गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी भक्तांची सकाळपासून गर्दी होऊ लागली आहे.
बाजारपेठेत रंगीत प्लास्टिक फुलांच्या माळा, मखर, पानांची कमान, घुंगरू, लोलक, मोत्यांची तोरणे यासह वेगवेगळी सजावट दुकानांमध्ये पाहणयास मिळत आहे. ग्राहकांच्या आर्थिक क्षमतेनुसार वेगवेगळे पर्याय खुले आहेत. याविषयी सजावटीचे साहित्य विक्रेते हरिष वाणी यांनी माहिती दिली.