जामनेर । जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून अशातच एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जामनेर-बोदवड रस्त्यावरील मलदाभाडी फाट्याजवळ झालेल्या विचित्र अपघातात जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकासह तीन जण जागीच ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये वाडीकिल्ला ता. जामनेर येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर त्र्यंबक पारधी (४२, रा.मालदाभाडी, ता.जामनेर), सुनिल शांताराम भोई (४५, रा. जामनेर रोड, बोदवड) आणि दत्तू रामा माळी (३०, रा. माळी वाडा, बोदवड) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील भोई आणि दत्तू माळी हे दुचाकीने जामनेरहून बोदवडकडे निघाले होते. त्याच्यामागे ईश्वर पारधी हे ही दुचाकीने मालदाभाडीकडे निघाले होते. मालदाभाडीनजीक समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने या दोन्ही दुचाकी आणि त्यांच्यामागे असलेल्या चारचाकी वाहनाला कट मारला. यामुळे दुचाकी बाजूला फेकल्या गेल्या आणि त्या एकमेकांवर आदळल्या. यात वरील तीनही जण जागीच ठार झाले. याचवेळी चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीही रस्त्याच्या बाजूला जाऊन कोसळली. यात चारचाकीतील तीन जण जखमी झाले आहेत. ते पुण्याहून घाणखेड ता. बोदवडकडे निघाले होते.