जळगाव: बुधवारी (१८ डिसेंबर) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर झालेल्या अपघातात विठ्ठल पांडुरंग शेळके (५५, रा. रामेश्वर कॉलनी) हे जागीच ठार झाले. कामावरुन दुचाकीने घरी जात असताना भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.
रामेश्वर कॉलनीतील विठ्ठल शेळके हे एका नाश्त्याच्या दुकानावर कामाला होते. रात्री दुकानातून ते दुचाकीने घरी जात असताना भुसावळकडून ईच्छादेवी चौफुलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने (जीजे १४, एटी २४२४) दुचाकीस्वार विठ्ठल शेळके यांना धडक दिली. या घटनेत शेळके यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
अपघाताची माहिती मिळताच शेळके यांच्या कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. शेळके यांचा मृतदेह बघताच त्यांच्या परिवाराने आक्रोश केला. शेळके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून चालकाविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. अपघातानंतर अजिंठा चौफुली परिसरात काही वेळ वाहतूक खोळंबली होती.