Jalgaon Accident News : रेल्वे स्थानकानजीक धावत्या रेल्वेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

जळगाव : धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका ५१ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार, १ सप्टेंबर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उघड झाली. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय दिनकर कोळी (वय ५१ रा. ममुराबाद रोड, सुनंदिनी नगर, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

जळगाव शहरातील सुनंदिनी नगरात संजय कोळी हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. ते वेल्डिंग दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करत होते. ते नेहमीप्रमाणे शनिवार, ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता ते वेल्डिंगचे दुकान बंद करून घराकडे निघाले होते.  दरम्यान, जळगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खंबा क्रमांक ४२१ जवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुसऱ्या दिवशी रविवार, १ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या खिश्यातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव रेल्वे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.