Jalgaon Accident : भरधाव ट्रकने दोन तरुणींना चिरडले, चिमुकला गंभीर

जळगाव : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणी जागीच ठार तर, एक चिमुकला गंभीर जखमी झाला. ही  घटना मानराज पार्कजवळ दुपारी १.५० वाजेच्या सुमारास घडली. जखमी चिमुकला एक वर्षाचा असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

जळगाव शहरातून जाणारा हा महामार्ग खड्डेमय झाला असून, ते खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात नेहमी लहान-मोठे अपघात होत आहेत. आज बुधवारी दुपारी १.५० वाजेच्या सुमारास दोन तरुणी आणि एक चिमुकला दुचाकीने (क्र. एमएच.१८.एएस.५३७९ ) खोटेनगर स्टॉपकडून उड्डाण पुलाने मानराज पार्ककडे जात होते. दरम्यान, उड्डाणपूल उतरताच भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. अपघातात दोघींचा जागीच मृत्यू झाला.तर, चिमुकला गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारार्थ रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, माजी महापौर जयश्री महाजन या एका कार्यक्रमानिमित्त द्वारकानगरकडे जात असताना त्यांना महामार्गावर गर्दी दिसली. त्यांनी आपले वाहन थांबवले आणि काय झालंय ? अशी विचारपूस केली. अपघाताचे झाल्याचे कळताच माजी महापौर या मयतांच्या नातेवाईकांना घेऊन बाळ उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णालयात रवाना झाल्या. यावेळी घटनास्थळी मोठा जमाव जमला असून पोलीस पोहचले आहेत. माजी नगरसेवक अमर जैन देखील मदतकार्य करीत आहेत.