इच्छादेवी डीमार्टसह जळगाव-चाळीसगाव रस्त्याचे काम रखडलेलेच

जळगाव : पूर्वीच्या जळगाव-पाचोरा राज्यमार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून न्हाई कडे हस्तांतरण झाले. आणि जळगाव पाचोरा राज्य मार्ग 185 ऐवजी एनएचजे 753 नुसार 2018-19 मध्ये सुरू होउन जळगाव मनमाड दरम्यान काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. परंतु इच्छादेवी चौफुली ते रायसोनी महाविद्यालयासह वावडदा, वडली, पाथरी, सामनेर, नांद्रा, खेडगाव, पासर्डी आणि हिंगोणे खु आदी आठ ते नऊ ठिकाणच्या वळण रस्त्यांची कामे महसूल विभागासह ‘न्हाई’च्या अनास्थेमुळे अपूर्णावस्थेत आहे.

जळगाव मनपा प्रशासनाकडून त्यांच्या हद्दीत असलेल्या रस्ताची हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया अपूर्ण आहे. तसेच ग्रामीण भागात महसूल विभागाकडून भूसंपादन प्रकिया झाल्यास पावसाळ्यात देखील उर्वरित काम सुरू करता येईल, असे ‘‘न्हाई’च्या धुळे विभाग कार्यकारी अभियंत्यांनी ‘तरूण भारत’शी बोलतांना सांगीतले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला जळगाव ते पाचोरा राज्यमार्ग क्रमांक 185 पाचोरा शहराबाहेर वरखेडी नाक्याजवळ राज्य मार्ग क्रमांक 19 ला जोडला जातो. पाचोरा ते जळगाव रस्त्यासह थेट चाळीसगाव आणि पुढे मालेगाव ऐवजी नांदगाव मार्गे मनमाड जवळ मुंबई आग्रा महामार्गाला जोडणारा मार्ग एनएचजे 753 नुसार नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीकडे ‘न्हाई’कडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. पाचोरा जळगाव रस्त्याचे काम ‘न्हाई’ अंतर्गत अशोका बिल्डकॉन कंपनीकडून गेल्या एक दिड वर्षापूर्वीच पूर्ण झाले आहे. परंतु मधल्या भागात सामनेर, पाथरी, वडली, तसेच भडगाव तालुक्यात पासर्डी आणि हिंगोणे गावाजवळील वळण रस्ते भूसंपादन प्रकिया रखडल्यामुळे अपूर्ण आहेत.

प्रक्रिया रखडल्याने रस्ता अपूर्ण

मनपा हद्दीतील इच्छादेवी चौफुली ते रायसोनी महाविद्यालय रस्त्याचे काम न्हाई अंतर्गत पूर्ण केला जाईल परंतु मनपाकडून हस्तांतरण प्रक्रियाच झालेली नाही. तसेच उर्वरित ग्रामीण भागातून जाणार्‍या वळण रस्त्यांच्या ठिकाणी भूमी अधीग्रहण प्रकिया झालेली नाही. उपविभागीय अधिकारी स्तरावरून आतापर्यत दोन ते तीन वेळा नोटीफिकेशन काढण्यात आले आहे. भूसंपादन रखडल्यामुळे काँक्रीटीकरणाचे काम सात ते आठ ठिकाणी अपूर्ण आहे. भूसंपादन नोटीफिकेशन प्रकिया महसूल विभागकडून पुन्हा केली जाणार असून मार्च पूर्वी पूर्ण झाल्यास पावसाळयात देखील काँक्रीटीकरणाचे काम केले जाईल, असे नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता महाले यांनी सांगीतले.

अंदाजपत्रकासह जीएसटीचा लागणार अधिभार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण धुळे विभागांतर्गत असून अशोका बिल्डकॉन कंपनीकडून जळगाव शहर मनपा हद्द तसेच मधले वळण तुकडे वगळता अन्यत्र काम पूर्ण झाले आहे. शहरातील इच्छादेवी चौफूली ते मनपा हद्दीपर्यतच्या रस्ते काँक्रीटीकरण ऐवजी डांबरीकरणासाठी आतापर्यत दोन वेळा अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. चार कि.मी.रस्त्याचे सुमारे सहा कोटींच्यावर खर्चाचे डांबरीकरणाचा प्रस्ताव आहे. त्यावर 18 टक्के जीएसटीसह सुमारे आठ लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव तिसर्‍या वेळेस मुंबई स्थित वरीष्ठ स्तरावर रवाना झाला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळून कामास पावसाळ्यापूर्वी कि पावसाळ्यानंतर सुरूवात होते हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

आम्हीच बनवणार म्हणून रस्ता धूळखात

जळगाव- मनमाड रस्त्याची ईच्छादेवी चौक ते रायसोनी महाविद्यालय जवळ हॉटेल आमंत्रण पर्यंत चार किमी पर्यंत च्या मनपाची हद्द आहे. यातील चार कि.मी.रस्ता मनपा प्रशासन आम्ही स्वतः करणार असे म्हणून आतापर्यत विस्तारीकरर्णें कॉक्रिटीकरणासह विकासकामे रखडली आहेत. रेल्वे उड्डाणपूलाचे देखील असेच काम रखडले होते. अखेर निधी नाही म्हणून रडगाणे गात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्याचे काम हस्तांतरीत करण्यात आले. त्यानंतर शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाचे काम दोन तीन वर्षात पूर्ण झाले. इच्छादेवी रस्त्याचे देखील असेच असून सुरूवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे व नंतर अतिक्रमण हटविण्यावेळी आलेले अडथळे पहाता निधीचे रडगाणे पुढे करून गेल्या दोन अडिच वर्षापासून काँक्रीटीकरणाचे काम रखडले आहे. अखेर हो नाही करत ‘न्हाई’ कडून रस्ता पूर्ण करण्यासाठी चर्चा करण्यात आली. त्यानुसार शहर हद्दीतील चार किलोमीटर रस्ता काँक्रीटीकरण ऐजवी डांबरीकरणाचा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. प्रस्तावावरच सर्व विकास अवलंबून आहे, अन्थथा रस्ते विकास अधांतरीच रहाणार असल्याचे चित्र आहे.