जळगावात अपघाताची मालिका थांबेना! भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले

जळगाव । जळगाव शहरात अपघाताची मालिका सुरूच असून अशातच भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना शहरातील अजिंठा चौफुलीवर घडलीय. विठ्ठल पांडुरंग शेळके (वय 55) असं मृत प्रौढाचे नाव आहे. दरम्यान अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकचालकाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
जळगाव शहरात एक दुर्दैवी अपघात घडला, ज्यामध्ये एक दुचाकीस्वार जागीच मृत्युमुखी पडला. अजिंठा चौफुली येथे सुसाट वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ही घटना घडली.

रामेश्वर कॉलनीत राहत असलेले विठ्ठल पांडुरंग शेळके हे बळीराम पेठेतील एका नाष्ट्याच्या दुकानात कामाला होते. रात्री काम संपल्यावर ते दुचाकीने घरी परतत होते, तेव्हा अजिंठा चौफुलीवर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात विठ्ठल शेळके यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रक चालक पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, मात्र परिसरातील वाहनधारकांनी त्याला अडवून पोलिसांना माहिती दिली. एमआयडीसी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रक ताब्यात घेतला. विठ्ठल शेळके यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताचे वृत्त कळताच शेळके कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.