Jalgaon City Assembly Constituency, रामदास माळी : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिला असून सतत १० वर्षांपासून या मतदारसंघात कमळ फुलत आहे. पुन्हा तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीतही महायुती भाजपचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांनी बाजी मारली. शहरातील जनतेने त्यांना ८७ हजारांचे मताधिक्य देऊन कौल दिला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात असलेल्या महाविकास आघाडीच्या उबाठा गटाच्या उमेदवार जयश्री महाजन यांना ६४ हजार ३३ मते मिळाली. त्यांना मोठ्या फरकाने पराभव पत्कारावा लागला. भाजपची शहरातील बूथ रचना आणि आमदार भोळे यांचा तगडा जनसंपर्क आणि लाडकी बहिणींनी दिलेला आशीर्वाद या बाबी आमदार भोळे यांच्यासाठी जमेच्या ठरल्या. परिणामी भाजप उमेदवार भोळे यांना जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळाले.
शहरात निवडणुकीचे वातावरण व राजकीय स्थिती लक्षात घेता महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश भोळे व महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्यात तगडी लढतीचे चित्र दिसत होते. मात्र मतमोजणीत पहिल्या फेरीपासून भाजपचे आमदार भोळे यांनी आघाडी घेतत्याने प्रत्येक फेरीला त्यांचे मताधिक्य वाढतच राहिले. त्यामुळे जळगाव शहरातील जनतेचा कौल भोळे यांच्याकडे झुकत असल्याचा अंदाज पहिल्या फेरीतून स्पष्ट झाला होता.
अपक्ष उमेदवारांना जळगावकरांची नापसंती
जळगाव शहर मतदारसंघात २९ उमेदवार मैदानात होते. जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार या मतदारसंघातून रणांगणात होते. या मतदारसंघात भाजपचे डॉ. अश्विन सोववणे, माजी नगरसेवक मयूर कोपसे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीचे उमेदवार आमदार भोळे यांचे मताधिक्य कमी होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री महाजन यांना त्यांचा फायदा होईल, असे चित्र दिसत होते. त्यातच उत्बाठा शिवसेना गटाचे कुलभूषण पाटील यांनीही बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना त्यांचा फटका बसेल असे बोलले जात होते. मात्र या मतदारसंघाचा इतिहास लक्षात घेता अपक्ष उमेदवारास जनता नाकारत असल्याचे दिसून येते, तीन विधानसभा निवडणुकीत शहरातील मतदारांनी अपक्ष उमेदवाराला पसंती दिलेली नाही. त्यामुळे अपक्षांना अत्यल्प मतदान झाले आहे. अपक्ष उमेदवारांकडे मतदारांनी पाठ फिरविल्याने राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी कौल दिला दिल्याचे निवडणुकीत दिसून येत आहे.
नगरसेवक, मनपा विरोधी पक्षनेते आणि त्यानंतर तीनवेळा आमदार म्हणून शहरातील जनतेने भोळे यांना कौल दिला आहे. आमदारकीच्या १० वर्षांच्या कार्यकाळात भोळे यांनी जनतेशी नगरसेवकाप्रमाणे नाळ जुळवून ठेवल्याने मोठे मताधिक्य मिळविण्यात ते यशस्वी ठरले. शहरातील भाजपची बूथ रचना आणि भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची फळी महायुतीच्या उमेदवारासाठी महत्वाची भक्कम बाजू ठरली. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उबाठा सेनेची पक्षीय बांधणी व रचना फारशी मजबूत नव्हती. त्यातच ऐन निवडणूक काळात पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाअभावी उबाठा शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे शहर मतदारसंघात महायुतीलाही त्याचा काही प्रमाणात लाभ झाला आहे. मात्र महाविकास विरोधी मोठी लाट असल्याचे विधानसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले. जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीतील पक्षांना त्यांचा जोरदार फटका बसला.
२७ उमेदवारांचे होणार डिपॉझिट जप्त
जळगाव शहर मतदारसंघात २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी निवडणूक लढविणाऱ्या २२ अपक्षांसह ५ राजकीय पक्ष मिळून २७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुश्की आली आहे. या मतदारसंघात जिल्ह्यात सर्वाधिक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. त्यामुळे उमेदवारांची मोठी भाऊगर्दी झाली होती. यात अपक्ष उमेदवार डॉ आश्विन सोनवणे यांना ६ हजार ९२०, तर कुलभूषण पाटील यांना ३ हजार ३५ मते मिळाली. त्याचप्रमाणे अपक्ष जयश्री महाजन यांना २ हजार ९० तर वंचित बहुजन आघाडीचे ललितकुमार गोगले यांना ४ हजार १९१ मते मिळाली. मनसेचे डॉ. अनुज पाटील यांना १ हजार ४७० मते मिळाली. हे पाच उमेदवार वगळता इतर २२ उमेदवारांना हजाराचा मतदानाचा आकडाही गाठता आलेला नाही. त्यामुळे हौस म्हणून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी चांगलाच फटका दिला आहे.
भंगाळेचा प्रवेश फलदायी
मतदानाच्या पूर्वसंध्येला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे भाजप उमेदवार भोळे यांच्यासाठी हा प्रवेश मताधिक्यात भर पाडणारा ठरला. उबाठा गटात ऐन निवडणुकीत खिंडार पडल्याने जळगाव शहरात आमदार भोळे व जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी हा प्रवेश निश्चितच फलदायी ठरला.