जळगाव : प्रशासन पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने १०० दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेच्या अंतरिम मूल्यमापनात नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रथम स्थान पटकावले, तर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना गौरवपत्र प्रदान करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले.
गुरुवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, तसेच क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. राज्यभरातून ६,८५४ अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
राज्य शासनाने निश्चित केलेल्या १०० दिवसांच्या आराखड्यानुसार नागपूर आणि जळगाव या दोन जिल्हाधिकारी कार्यालयांनी प्रशासनाच्या सुधारित कार्यप्रणालीत उत्तम कामगिरी बजावली. यामुळे या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर आपल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली.
हेही वाचा : सेवानिवृत्त सैनिकाने मुलाचा खून करून घेतला गळफास; कारण आलं समोर
जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि नागपूर जिल्हाधिकारी अनिल कुंभार यांनी प्रशासनात पारदर्शकता, डिजिटलायझेशन आणि गतिमान सेवा वितरणासाठी राबवलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून ई-ऑफिस प्रणालीद्वारे कामकाज सुलभ आणि पारदर्शक केले आहे. हे पाहून मुख्यमंत्र्यांनी विशेष दाद दिली.
राज्यातील ३६ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ३६ जिल्हाधिकाऱ्यांमधून विभागीय आयुक्त स्तरावर छाननी करून प्रत्येकी सहा जणांची निवड करण्यात आली. त्यानंतर ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी २ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची, तर महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी २ जिल्हाधिकाऱ्यांची अंतिम निवड केली. या प्रक्रियेत जळगाव आणि नागपूर या दोन जिल्हाधिकारी कार्यालयांनी बाजी मारली.
या विशेष मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १५ विभागांच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. जळगाव आणि नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयांनी प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रम, जलद सेवा वितरण आणि पारदर्शक व्यवस्थापन कसे राबवले, यावर सविस्तर माहिती दिली. या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण केले आणि पुढील कार्य आराखड्याची रूपरेषा मांडली.
मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत पारदर्शक आणि गतिमान प्रशासन कसे उभारले, याचे कौतुक करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचे अभिनंदन केले. जळगावच्या प्रशासनाने पुढेही नवे उपक्रम राबवून राज्यात आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.