जळगाव : वडिलांकडून पाच लाखाची रोकड तसेच माहेरुन तीन लाखाचे सोन्याचे दागिने घेऊन आणण्याची मागणी करत विवाहितेला स्वयंपाक घरातील साहित्याचे चटके देत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने पोलीस ठाणे गाठून कैफियत मांडली. याप्रकरणी पती अमित रामदेव पंडित (ह.मु. प्रथम अपार्टमेंट, विधाते नगर, पाखळरोड, नाशिक) यांच्यासह सासरच्या पाच जणांविरुध्द शनीपेठ पोलीस ठाण्यात 12 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
29 वर्षीय विवाहितेचे माहेर शनीपेठेत आहे. विवाहिता पती तसेच सासरचे लोक यांच्यासमवेत विधातेनगर, नाशिक येथे 11 मार्च 2020 पासून वास्तव्यास होती. वडिलांकडून 5 लाखाची रोकड तसेच माहेरुन 3 लाखाचे दागिने घेऊन आणण्यासाठी विवाहितेकडे पतीसह सासरच्या लोकांनी सतत मागणी केली. मागणीची पूर्तता होत नसल्याने विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ करण्याला सुरुवात केली. शिवीगाळ, चापटा बुक्क्यांनी मारहाण असे नित्याचे झाले. हा जाच कमी म्हणून स्वयंपाक घरातील साहित्याचे तिला चटके देवून जिवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून विवाहितेने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सासू शारदा पंडित श्रध्दा कॉलनी जळगाव, पती अमित पंडित नाशिक, दिर राज पंडित पुणे, ननंद प्रीती जैन पुणे, काका सासरे प्रकाश पंडित विवेकानंदनगर जळगाव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेकॉ प्रकाश पाटील करत आहेत.