जळगाव : दुचाकी चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. उलटपक्षी दिवसेंदिवस चोरट्यांची हिंमत वाढत असल्याचा परिचय चोरीच्या घटनांमधून येत आहे. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांनी समाजमन भयभीत झाले आहे. चोरट्यांना कसलाच धाक राहिला नाही, असा सूर समाजमनातून उमटत आहे.सार्वजनिक ठिकाणाहून तर चोरटे दुचाकी नेता आहेतच, परंतू अलिकडे रहिवास असलेल्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून, घराच्या दारासमोर लावलेली दुचाकीसुध्दा चोरुन नेण्यापर्यत मजल चोरट्यांची गेल्याने सुरक्षिततेचा बोजवारा उडाला आहे.
दररोज कोणत्या कोणत्या पोलीस ठाण्यात दुचाकी चोरून नेल्याची तक्रार दाखल होत आहे. गुन्हेगारांना वाहन चोरण्यास जणू रान मोकळं झाल्याने शहरात चोरीचे सत्र सुरू आहे.समाजाला असुरक्षित वाटणाऱ्या या घटनांकडे गांभीर्याने घेण्याची गरज आहे. दुचाकी चोरीच्या घटना जास्त चिंताजनक असल्याचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनीही तरुण भारत लाईव्ह संवादात म्हटले होते. समाज निर्भयपणे असला पाहिजे, ही अपेक्षा अतिशयोक्ती नाही. परंतु आज समाजाला असुरक्षित झाल्याची भिती त्रासदायक ठरली आहे. अशा प्रसंगी कायद्याची धुरा सांभाळणाऱ्या शिलेदारांवर सुरक्षेची, सुव्यवस्थेत बाधा आणणाऱ्या प्रवृत्तीला शोधण्याची, कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण होते.
त्यानुसार पाऊले उचलली जात असतात.परंतु परिणामकारक कृती घडत नसेल, किंबहुना अशा घटना नियंत्रणात येत नसतील तर त्यावेळी यंत्रणाच्या कार्यपध्दतीवर समाजमनात सवाल उपस्थित होत असतो.गुन्हा घडणे हे अजिबात निश्चित नसते, हे अगदी खरेच आहे. गुन्हे घडण्याचे अनेक कारणे असतात. परंतु समाजाला भय वाटेल किंवा समाजाला जगताना असुरक्षितता वाटेल अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या घटनांकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे. खरं तर असे गुन्हे घडू नये, यासाठी ॲक्शन प्लॅन असतो.घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करणे, गुन्हेगाराचा शोध घेणे, त्याला न्यायालयात हजर करणे या बाबींवर यंत्रणेचा वेळ, परिश्रम अधिक खर्च होतो. त्यामुळे गुन्हा रोखणे याअनुषंगाने दैनंदिन कार्यपध्दतीत उपक्रम असला पाहिजे. किंवा तशा पध्दतीची कार्यपध्दती काळाची गरज ठरली आहे. बहुतांशी दुचाकी चोरीच्या घटना या सार्वजनिक ठिकाणांहून झाल्याचे दिसून येते. अलिकडे तर घरासमोरुनदेखील दुचाकी चोरुन नेत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. हे अधिक चिंताजनक आहे.
खरे गुन्हेगार मोकाट
दुचाकी चोरीच्या घटनांनी वाहन मालक खरंच भितीखाली वावरत आहेत. दुचाकी चोरट्यांना पकडण्यात दिरंगाई दिसते. निष्पाप व्यक्तीला संशयावरुन पकडले जाते. खरे गुन्हेगार पकडले जात नाहीत. म्हणून दुचाकी चोरी थांबत नाही. खरे गुन्हेगारांना पकडले गेले तर चोरी नियंत्रणात येईल. नागरिकांनीही थोडी काळजी घ्यायला हवी.
– ॲड. कुणाल पवार, जळगाव न्यायालय
वचक राहिला नाही
कायद्याचा वचक राहिला तर भिती असते. परंतु वचक राहिली नाही असे या घटनांमधून दिसते आहे. दुचाकी चोरी झाली. नागरिक तक्रार करायला गेले तर तुमचे लक्ष नव्हते का? तुम्ही कशी काय दुचाकी सोडून गेले, अशी विचारणा केली जाते. अन्याय झाला तर त्याला चुकीचे ठरविण्याची कृती चोरट्यांना फावते. पोलिसांनी प्रामाणिकपणे काम करावे. अशी अपेक्षा नागरिकांची असते.
– ॲड. वसंत ढाके,ज्येष्ठ विधीज्ञ जळगाव न्यायालय