Jalgaon Crime News : जळगाव पोलिसांना मोठं यश, कत्तलीपूर्वीच 25 गुरांची सुटका

जळगाव : राज्यभरासह जिल्ह्यात आज आषाढी एकादशी आणि बकरी ईद उत्सव उत्साहात साजरा झाला. दरम्यान, शहरातील एका परीसरात आज सकाळी आठ वाजता पोलिसांनी छापा टाकला असता बेकायदेशीररीत्या गोवंशाचे मांस आणि काही जनावरांना कोंबून ठेवल्याचे उघडकीस आले. यात तब्बल 25 गोवंश आणि मांस जप्त करण्यात आले. या प्रकरणी सहा संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले असूनया, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी नगराजवळील मुघल गार्डन परीसरातील सय्यद असरारूल कादरीया मशीदजवळील मोकळ्या जागेत बेकायदेशीररीत्या गोवंशाचे मांस आणि काही जनावरांना कोंबून ठेवल्याची गोपनिय माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांना मिळाली. त्यानुसार आज सकाळी आठ वाजता पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्यासह त्यांचे पथक आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी मुघल गार्डन परीसरात छापा टाकला. या प्रसंगी गोवंशाचे मांस आणि निदर्यपणे कोंबून व बांधून ठेवलेल्या 25 गोवंशाची जनावरे मिळून आली.

संशयित वकार युनूस मोईद्दीन शेख (29, मोहमदीया नगर), इमरान खान रहेमान खान (38, मुघल गार्डन), शेख दानीश शेख इरफान (21, उस्मानिया पार्क), सैय्यद शहिद सैय्यद यासीन (32, भिलपूरा, जळगाव), जावेद शेख रशीद शेख (34, मुघल गार्डन) आणि मोहम्मद अयुब हकीमोद्दिन खान (32, मुघल गार्डन, जळगाव) यांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.