Jalgaon Crime News : दारू पिण्यावरून वाद, सख्ख्या भावाला आयुष्यातून उठवलं, आरोपीला जन्मठेप

जळगाव : दारू पिण्याच्या कारणावरून सख्ख्या भावाचा खून करण्यात आल्याची घटना पिंप्राळा हुडको परीसरात 18 ऑक्टोबर 2019 रोजी घडली होती. या घटनेतील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने आज दुपारी दोन वाजता जन्मठेपची शिक्षा सुनावली. जय प्रल्हाद मरसाळे (पिंप्राळा हुडको, जळगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

शहरातील पिंप्राळा हुडको परीसरात प्रल्हाद तानु मरसाळे हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून त्यांचा मुलगा दीपक मरसाळे आणि जय मरसाळे यांच्यात नेहमी दारू पिण्यावरून वाद करत होते. दरम्यान, 18 ऑक्टोबर 2019 रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास दारू पिण्याच्या कारणावरून जय आणि दीपक यांच्यात वाद झाला. यात रागाच्या भरात जय याने दीपकच्या डोक्यात लाकडी दांडका टाकून खून केला तर वडील प्रल्हाद मरसाळे यांनादेखील दुखापत केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जय मरसाळे याला अटक करण्यात आली होती.

हा खटला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयातील न्या.जे.जे.मोहिते यांच्या न्यायासनासमोर चालला. सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. यात वडील प्रल्हाद मरसाळे, बहिण व भाचा यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यानुसार न्या.मोहिते यांनी जय मरसाळे याला दोषी ठरवत भावाचा खून व वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी जन्मठेप आणि दंडांची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड. वैशाली महाजन यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार संजय गोसावी आणि केसवॉच इकबाल पिंजारी यांनी सहकार्य केले.