जळगाव : तुमचे घर पसंत आहे, तुम्हाला डिपॉझिट पाठवायचे आहे, तुम्ही मला ‘फोन पे’वर पाच रुपये पाठवा, मी तुम्हाला दुप्पट 10 रुपये पाठवितो, असे सांगत विश्वास संपादन करीत भामट्याने पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एक लाख 75 हजारांचा गंडा घालत दीपनगर (ता. भुसावळ) येथील महिलेची फसवणूक केली. याप्रकरणी एकाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा भुसावळ तालुका पोलिसात दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रानुसार, रणदीपसिंग याने तुमचे घर पसंत असल्याचे मोबाईल (9874121142) वर कॉल व मेसेज करून सांगत घर भाडे डिपॉझिट करण्यासाठी विसपुते यांना फोन पे नंबर दिला. तुम्ही मला त्यावर पाच रुपये पाठवा, त्या बदल्यात तुम्हाला 10 रुपये मिळतील, असे सांगत 10 रुपये फोन पेद्वारे पाठवून विसपुते यांचा विश्वास मिळविला.
विसपुते यांची दिशाभूल करून त्यांना पाठविलेल्या रक्कमचे डबल पैसे परत करण्याचे नावाखाली पैसे मागून विसपुतेंकडून एक लाख 75 हजार रुपये स्वीकारले. घेतलेल्या रकमेच्या बदल्यात विसपुते यांना रणदीपसिंग याने कुठलीही रक्कम परत न देता यांची फोन पेच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक केली.
याप्रकरणी स्नेहलता विसपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी संध्याकाळी सात वाजता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परीवेक्षाधीन डीवायएसपी सतीश कुळकर्णी तपास करीत आहेत.