जळगाव : राज्यासह जिल्हयात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अशातच यावल तालुक्यात विवाहितेवर, तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. विवाहितेला पळवून नेत अत्याचार केला. त्यातून पीडिता गर्भवती राहिली. संशयिताने गर्भपात करण्यास भाग पाडले. नंतर लग्न न करता, पीडितेची फसवणूक केली. तर दुसऱ्या घटनेत, ३२ वर्षीय तरुणीशी प्रेम संबंधानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. त्यातून पीडिता तब्बल तीन वेळा गर्भवती राहिली. तरूणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी संशयितांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रानुसार, यावल तालुक्यातील एका गावातील २६ वर्षीय विवाहितेला पळवून नेत विविध ठिकाणी लॉजवर नेऊन अत्याचार केला. त्यातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर संशयिताने गर्भपात करण्यास भाग पाडून नंतर लग्न न करता, पीडितेची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिसात संशयित सर्फराज सईदखान (रा. फैजपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ करीत आहे.
दुसऱ्या घटनेत यावल तालुक्यातीलच एका गावात ३२ वर्षीय तरुणीशी प्रेम संबंधानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. त्यातून पीडिता तब्बल तीन वेळा गर्भवती राहिली. तरूणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन संशयित रामचंद्र संघरत्न वाघोदे (रा. वडगाव, ता. रावेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित रामचंद्र वाघोदे याने फैजपूर पोलिस ठाण्यातच हातावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (ता. १) दुपारी साडेबाराला घडली. त्याच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.