Jalgaon Crime News : भोईटेनगरमध्ये पुन्हा बंद घर फोडले, तीन लाखाचा मुद्देमाल लांबविला

जळगाव : बंद घराला लक्ष्य करुन चोरटे घर फोडत आहेत. सहा दिवसापूर्वी भोईटेनगरात परिचारिकेचे बंद घर फोडून चोरीची घटना ताजी असतानाच सोमवार, ९ रोजी पुन्हा या परिसरात बंद घरातून चोरट्यानी ३ लाख १७ हजार २०० रुपयांचे दागिने रोकड असा मुद्देमाल लांबविला. भोईटेनगरातील गौरी प्राईड अपार्टमेंट येथे ही घरफोडी झाली.

मयुर बाळासाहेब देशमुख (वय ३६, रा. गौरी प्राईड अपार्टमेंट) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी शनिवार, ७ ते सोमवार, ९ च्या सकाळी सात वाजेदरम्यान हे घर फोडले. घराचे मुख्य गेट व मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात एन्ट्री केली. घरात मुद्देमाल शोधताना सामान अस्तव्यस्त केला.

असा नेला मुद्देमाल

३६०० रुपये किमतीचा चांदीचा करदोडा, ९०० रुपये किमतीचा चांदीचा शिक्का, ४५०० रुपये किमतीचे देवाच्या चांदीच्या मुर्ती, ३६०० रुपये किमतीचे चांदीचे वाळे दोन जोड, १८०० किमतीचे चांदीचे जोडवे एक जोड, १८०० रुपये किमतीची चांदीची अंगठी, १ लाख ४०००० किमतीचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, १४ हजार किमतचे चार ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, ७ हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान, ७० हजार किमतीचे २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगळ्या, ७० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख १७ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.

उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तसेच माहिती घेतली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास सपोनी रामचंद्र शिखरे हे करीत आहेत.