Jalgaon Crime News : सध्या जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. महिलांची छेडछानी वा हाणामारी असो की खंडणीचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. अशात खंडणीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यावसायिकाला धमकी देत खंडणी मागण्यात आली आहे. खंडणी बहाद्दरांची मागणी ही चकित करणारी असून, या आरोपींनी धंदा करायचा असेल तर दररोज आम्हाला बिअर आणि महिन्याला दहा हजार रुपये द्यावे लागतील, असा दम भरला. एवढंच नाही तर संशयितांनी चॉपर काढत व्यावसायिकाला शिवीगाळदेखील केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खंडणीचा हा प्रकार मंगळवार, १ एप्रिल रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास घडला. शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ एन.एन. वाईन शॉप दुकानात हा प्रकार घडला. या प्रकरणी वाईन शॉप चालक अमोल संतोष कोळी (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आकाश पाटील, गंप्या उर्फ अक्षय राठोड, दीपेश उर्फ फॉक्सन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली.
व्यापारी वर्गांमध्ये भीती
दरम्यान, खंडणीच्या या प्रकारामुळे व्यापारी वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढीस आल्या आहेत. व्यापाऱ्यांनाही या गुन्हेगारीचा त्रास सातत्याने सहन करावा लागत आहे. अनेक व्यापाऱ्यांना त्रास देत त्यांच्याकडून खंडणी उपाडली जात आहे. यातील बहुतांश व्यापारी हे गुन्हेगारांच्या भीतीपोटी पोलिसात तक्रार देत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तरी गुन्हेगारीचा हा प्रकार लक्षात घेत पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.

महिला डॉक्टरचा विनयभंग
जळगाव : पाठलाग करत महिला डॉक्टराला अप्रिय शब्दप्रयोग करत विनयभंग केला. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून महिलेने तक्रार दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. २६ वर्षीय महिला डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता संशयित तरुण डॉक्टर महिलेच्या टेबलाजवळ आला. या ठिकाणी त्याने लज्जास्पद शब्दप्रयोग केला. या पूर्वीही या संशयिताने रस्त्यावर गाठत महिला डॉक्टरला छेडण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करत त्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या त्रासाला कंटाळून अखेर डॉक्टर महिलेने पोलिसात तक्रार दिली.
त्यानुसार संशयित तरुणावर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक ए. सी. मनोरे यांनी घटनास्थळी जाऊन प्रकार जाणून घेतला. हवालदार अतुल महाजन हे तपास करीत आहेत