---Advertisement---
Jalgaon Crime News : भाडे कराराची जागा खाली करुन घेण्यासाठी होणारा मानसिक छळ आणि धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या एक हॉटेल व्यावसायिकाने आपली जीवन यात्रा संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सततचं स्टॉर्चर आणि धमकाविल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं मयताने सुसाईड नोटमध्ये नमुद केले आहे. जळगाव शहरातील हा प्रकार असून आत्महत्येच्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अशिष मधुकर फिरके असे मयत हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. अशिष फिरके शहरातील निवृत्तीनगरातील रहिवासी होते. तर शहरातील रिंगरोडवर हॉटेल व्यावसाय करीत होते. रामसहाय शर्मा यांच्या मालकीच्या हॉटेल रोनकची जागा त्यांनी भाडेतत्वावर घेतली होती. मात्र, ही जागा खाली करुन द्यावी, यासाठी रामसहाय शर्मा यांनी त्यांना धमकवित मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून अशिष फिरके यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मयताच्या नातेवायिकांनी केला आहे.
दिलेल्या शब्दाला मुकला जागा मालक
हॉटेल व्यावसायिक अशिष फिरके यांनी रामसहाय शर्मा यांच्या मालकीची हॉटेल रोनकची जागा व्यवसायासाठी भाडेतत्वावर घेतली होती. या जागेवर ते तीन वर्षापासून हॉटेल व्यवसाय करत होते. त्यावेळी रामसहाय शर्मा यांनी अशिष फिरके यांना जागेच्या व्यावसायिक वापरासाठी तीन वर्षाचा करार करुन दिला होता.
मात्र, हा करात संपला होता. त्यामुळे नवीन करार करा असं आशिष फिरके यांनी जागामालक शर्मा यांना सांगितले होते. त्यावेळी रामसहाय शर्मा म्हणाले, बेटा टेन्शन मत ले. मै अग्रीमेंट तीन साल का कर दुंगा. तु तेरे हिसाबसे हॉटेल बना ले. रामसहाय शर्मा यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अशिष फिरके यांनी हॉटेलवर दुरुस्तीवर खुप खर्च केला. मात्र, रामसहाय शर्मा यांनी दिलेल्या शब्दावरुन घुमजाव केले आणि त्यांनी अचानक फिरके यांना जागा खाली करुन देण्यासाठी तगादा लावत फिरके यांना धमकवित मानसिक त्रास दिला.
आत्महत्येपूर्वी लिहिली सुसाईड नोट
हॉटेल व्यावसायिक अशिष फिरके यांनी रविवारी (14 सप्टेंबर) रोजी मध्यरात्रीनंतर शहरातील निवृत्तीनगर येथे आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहिली असून त्यात आत्महत्येचे कारण नमुद केले आहे. आत्महत्येच्या पुर्वी लिहिलेल्या पत्रास, सुसाई़ड नोट असं शिर्षक देत 14 सप्टेंबर 2025 तारीख टाकुन आशिष फिरके यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमध्ये ते लिहितात, मी आशिष मधुकर फिरके असे लिहुन देतो की, माझ्या मौतीला जबाबदार फक्त आणि फक्त श्री रामसहाय शर्मा म्हणजे हॉटेल रोनक या जागेचे मालक. मी यांच्या जागेत तीन वर्षापासुन हॉटेल व्यवसाय करतो. तरी मला यांनी आधी तीन वर्षाचे अग्रीमेंट करुन दिले होते आणि आता मला सांगितले की, बेटा टेन्शन मत ले. मै अग्रीमेंट तीन साल का कर दुंगा. त्यांनी मला सांगितले तु तेरे हिसाबसे हॉटेल बना ले. मी खुप खर्च पण लावला. आणि आता अचानक त्यांनी मला जागा खाली करुन दे, असं मला सतत टॉर्चिंग करत होते. मी खूप विनंती करुनही मला त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले. मी त्यांना सांगितले की, मला दोन लहान मुले आहे, त्यांचा तरी विचार करा. तर ते मला म्हटले की, मुझे कुछ लेना देना नही. आणि मला खुप टॉर्चींग करत होते. वेळोवेळी त्यांचा मुलगा श्री रजनील रामसहाय शर्मा यांनी खूप धमक्या दिल्या. म्हणून मी आत्महत्या करत आहे, असे नमुद करत त्यांनी स्वाक्षरी केली. तसेच बाजुला रामसहाय शर्मा तसेच रजनील शर्मा यांचे नाव नमुद करत त्यांचे मोबाईल क्रमांक देखील लिहिले आहेत.
सुसाईड नोटचे ठेवले स्टेटस
मयत अशिष फिरके यांनी सुसाईड नोट फक्त लिहिलीच नाही तर आत्महत्येच्या काही वेळेपूर्वी ती सुसाईड नोट आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवली आणि काही वेळाने अशिष यांनी मृत्यूला कवटाळले.