जळगाव : रेकॉर्डवरील चोरटा प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडितराव साबळे (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्याने छत्रपती संभाजी नगर येथील महिलेच्या गळ्यातून सोनसाखळीसह इतर ठिकणी चोरी केल्याचे कबूल केले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे ५ फेब्रुवारी रोजी सुनीता भीमराव नेमाने (रा. शास्त्रीनगर, छत्रपती संभाजीनगर) या पायी जात होत्या. यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघां अनोळखींपैकी मागे बसलेल्याने १८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी गळ्यातून हिसकावून नेली होती. ही चोरी जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत साबळे याने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी सहायक फौजदार संजय हिवरकर, रवींद्र नरवाडे, अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, राजू मेढे, हरिलाल पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या.
पथकाने प्रशांतला सुप्रीम कॉलनी येथून ताब्यात घेतले. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. या तपासादरम्यान सोनसाखळी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले. प्रशांत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.